Thu, Nov 15, 2018 01:33होमपेज › Satara › डोंगरांना लागलेल्या आगीत वनसंपदा खाक

डोंगरांना लागलेल्या आगीत वनसंपदा खाक

Published On: Mar 13 2018 1:44AM | Last Updated: Mar 12 2018 8:18PMतळमावले : वार्ताहर

गुढे आणि खळे, वरची शिद्रुकवाडी ता. पाटण नजीक असलेल्या डोंगराला अज्ञातांनी लावलेल्या आगीमुळे डोंगरावरील वनसंपदा आणि वन्यजीव जळून खाक झाले आहेत. वनवा लावलेल्या अज्ञाता विरोधात वनविभाग कारवाई करणार का? गांधारीच्या भूमिकेतील वनविभाग जागा होणार का? असे संतप्त सवाल पर्यावरणप्रेमी विचारीत आहेत.  वनविभागाच्या निष्काळजीपणामुळे डोंगर जळून खाक झाल्यास नवल वाटायला नको. ही लागलेली आग विझवण्यासाठी वनविभागाने तत्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे. अन्यथा ही वृक्षवल्ली नामशेष झाल्याशिवाय राहणार नाही. ज्या ठिकाणी आग लागली आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडे  व दुर्मीळ वनस्पती होत्या ती झाडे जळून खाक झाली आहेत. त्यामुळे पर्यावरणाची हानी झाली आहे. ही आग लागू नये म्हणून उपाय योजना केल्या असत्या तर मोठ्या प्रमाणात हानी झाली नसती. या लागलेल्या आगीमध्ये वाळक्या झाडांच्यासह ओली झाडेही जळाली आहेत. आगी लावणारे समाजकंटक उन्हाळा सुरु झाला की आगी लावतात. वनविभागाने त्यांच्या मुसक्या आवळने गरजेचे आहे. 

या आगीत केवळ झाडेच नव्हे तर  जंगलातील सरडे, किटक,  फुलपाखरे, पक्षांची अंडी यासह औषधी वनस्पती नष्ट होत आहेत. ही पर्यावरणाची मोठी हानी आहे. त्यामुळे यावर वेळीच खबरदारी घेणे गरजेचे आहे. वृक्षतोड रोखण्यास अपयशी ठरलेले वनविभाग डोंगराच्या आगी रोखण्यातही अपयशी ठरत आहे,अशा प्रतिक्रिया पर्यावरणप्रेमींमधून उमटत आहेत. डोगरांना लागणारी आग विझवण्यासाठी वनविभागाने तत्काळ प्रयत्न करण्याची गरज आहे.