Wed, Jun 03, 2020 17:09होमपेज › Satara › वीज कनेक्शनऐवजी दिलं भलं मोठ्ठं बिल

वीज कनेक्शनसाठी नाही, बिल मात्र पावणेचार हजाराचे!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सातारा: प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या कारभाराचे रोज वाभाडे निघत असतानाही त्यांच्या कारभारात सुधारणा होत नाहीत. अगोदरच लोडशेडिंग आणि मीटरच्या समस्येमुळे जनता त्रस्त असताना आणखी नवनवे उद्योग समोर येत आहेत.  देगाव, ता. सातारा येथील एका शेतकर्‍याने कृषि पंपाच्या वीज कनेक्शनसाठी वारंवार मागणी करूनही त्याला ते दिले नाही.कहर म्हणजे या शेतकर्‍याला वीज कनेक्शन न देताच चक्‍क पावणेचार हजाराचे वीज बिल दिले आहे. यामुळे संबंधीत शेतकर्‍याच्या पायाखालची जमीन सरकली असून या कारभाराने संताप व्यक्‍त होत आहे. 

जिल्ह्यात महावितरणच्या कारभारामुळे नागरिक त्रस्त आहे. मिटरमध्ये असलेला दोष, फुगवून आलेली बिले यासह अन्य तक्रारी देण्यासाठी सध्या महावितरणची कार्यालये भरू लागली आहे. गेल्या महिन्यांपूर्वी बोरगावमधील दोन शेतकर्‍यांचे बिल भरले असताना त्यांना 7 हजार रूपयांची थकबाकी असल्याचे दाखवले होते. आता तर अधिकार्‍यांनी कहर केला असून देगाव येथील तानाजी रामचंद्र ढवळे यांना कोणतेही वीज कनेक्शन नसताना त्यांच्या नावे महावितरणने तब्बल 3 हजार 680 रूपयांचे वीज पाठवले आहे. 

तानाजी ढवळे यांनी नोव्हेंबर 2013 रोजी कृषी पंपाच्या वीज जोडणीसाठी अनामत रक्‍कम भरली होती. त्यानंतर महावितरणकडून पोल व तारा बसवण्यात आल्या. मात्र, कनेक्शला मीटरच न बसवल्याने विद्युत प्रवाह सुरू झाला नाही. आजतागायत कनेक्शला मीटर न बसवल्यामुळे विजेचा एक युनिटही वापर ढवळे यांच्याकडून झालेला नाही. तरीही ढवळे हे कृषीपंप चालवत असल्याचे समजून त्यांना हे बिल पाठवण्यात आले आहे. या बिलामध्ये मीटरचा फोटोच नसल्यामुळे किती युनिट वीज वापरण्यात आली, याचा उल्‍लेखच करण्यात आलेला नाही. तसेच मार्च 2017 पर्यंत 

त्यांची 1 हजार 284 रूपये  थकबाकी असल्याचे दाखवण्यात आले आहे. ग्राहकांच्या मनस्तापाची अधिकार्‍यांना नाही जाणीव आजपर्यंत थकबाकी, वीज बिलाचा फुगवटा, बिलातील चुका अशा समस्या होत्या. मात्र, आता वीज वापरली नसताना बिल काढल्याने महावितरणचा कारभार कशा पध्दतीने सुरू आहे याची प्रचिती येते. ग्राहकांना प्रचंड मनस्ताप होत असला तरी कोडगे झालेल्या अधिकार्‍यांना त्याची काहीही जाणीव नसल्याचे कारभारावरून दिसून येते.