Sun, Jul 21, 2019 08:36होमपेज › Satara › बिचुकलेंचा अर्ज निघाल्यानेच विश्‍वजित बिनविरोध

बिचुकलेंचा अर्ज निघाल्यानेच विश्‍वजित बिनविरोध

Published On: May 14 2018 10:58PM | Last Updated: May 14 2018 10:58PMसातारा : प्रतिनिधी

कडेगाव-पलूस विधानसभा मतदार संघात भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांनी माघार घेतल्यानंतर जरी चुरस संपली होती तरी सातारचे अभिजीत बिचुकले यांचा उमेदवारी अर्ज राहिल्याने निवडणूक अटळ झाली असतानाच खा. उदयनराजेंनी सुनिल काटकर यांच्याकडे मोहीम सोपवत अशी चक्रे फिरवली की बिचुकले यांना गाडीत घालून सातार्‍यातून 40 मिनिटांत तहसील कार्यालयाच्यासमोर पाचारण केल्यानंतर 2.50 वाजून  मिनिटांनी बिचुकल्यांचा अर्ज निघाला आणि विश्‍वजित कदम बिनविरोध निवडून  आले.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनानंतर रिक्‍त झालेल्या कडेगाव - पलूस विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार विश्‍वजित कदम व भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्यात लढत होणार होती. मात्र, भाजपने उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर दुपारी 2 पूर्वी संग्राम देशमुख यांचा अर्ज माघारी घेण्यात आला. त्यामुळे विश्‍वजित कदम यांचा बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला असतानाच हे अर्ज राहिल्याचे सगळ्यांच्या लक्षात आले. मात्र, दुपारचे 2 वाजले होते आणि अर्ज दाखल करणारा सातारचा होता. कवी मनाच्या अभिजीत बिचुकले यांनी विश्‍वजित कदम यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज भरला होता. कोण अभिजीत बिचुकले इथपासून मग शोधाशोध सुरु झाली आणि शोध उदयनराजेंपर्यंत येवून पोहोचला. ‘अरेच्चा, आपल्याच अभिजीतने अर्ज भरलाय का?’ असे म्हणत उदयनराजेंनी थेट सुनील काटकरांना फोन लावला.

काटकर हे यापूर्वी भारती विद्यापीठात सेवेत होते. त्यामुळे मुळातच त्यांचे आणि कदम परिवाराचे ऋणानुबंध. त्यात महाराजांचा फोन म्हटल्यावर काटकरांनी 200 च्या स्पीडने बिचुकलेंचा शोध घेतला. शेवटी विमल गार्डनमध्ये लढवय्ये अभिजीत बिचुकले राहतात, असा शोध लागला. सुनील काटकर, अशोक घोरपडे, अ‍ॅड. अंकुश जाधव, विलासराव पाटील, सुनिल बर्गे, आर. वाय. जाधव, रणजित माने, निवासराव पाटील, माणिक पाटील या मंडळींनी बिचुकलेंची विनवणी सुरु केली. तिकडे कडेगाव - पलूसला घाम फुटला होता आणि घाम फोडणारा सातारचा होता. आ. मोहनराव कदम, विश्‍वजित कदम कडेगाव तहसील कार्यालयाबाहेर चकरा मारत होते. निवडणूक एकतर्फीच होती. पण हा अर्ज निघाला तर बाकीची झेंगाट संपतील आणि विश्‍वजित कदम बिनविरोध होतील. यासाठी जोरदार फोनाफोनी सुरु होती.

कडेगाव-पलूसपासून सुर्ली घाट पास करुन फोनची रेंज विमल गार्डनपर्यंत धडकत होती. ‘आ, लेका सुनील, काय झालं, सांग की, अर्ज माघारी घ्यायला, ये घेवून,’ अशी तिकडून आर्जव सुरु होती. ‘आलो आलो,’ असे सुनील काटकर 70 कि.मी.वरुन सांगत होते. 50 मिनिटे बाकी होती, 70 कि.मी.चे अंतर होते. रस्त्यात टोलनाका, कराड शहर, सुर्ली घाट, प्रचंड वाहतूक असे अवघड व अशक्यप्राय असे कडेगावमध्ये वेेळेत पोहोचण्यासाठीचे आव्हान होते. त्यात बिचुकलेंची मनधरणी सुरुच होती आणि त्यांना काटकरांजवळ आपली राष्ट्रीय विचारधारा मांडायला सुरुवात केली होती. त्यामुळे घटिका जवळ येवूनही निर्णय होत नव्हता. शेवटी सुनील काटकरांनी धरलेला आग्रह मानून बिचुकले गाडीत बसले आणि सुसाट वेगाने गाडी सुटली ती थेट कडेगाव तहसील कार्यालयाबाहेरच जावून थांबली तेव्हा 2 वाजून 50 मिनिटे झाली होती. तोपर्यंत उमेदवार कोण याविषयीची उत्सुकता एवढी ताणली होती की आख्खा मतदार संघ तहसील कार्यालयाबाहेर हे सुप्रसिद्ध उमेदवार पाहण्यासाठी गर्दी करुन उभा होता.

सातार्‍यात जेवढी लोकप्रियता प्रेसनोट पाठवूनही बिचुकलींना मिळाली नाही तेवढेतर लोक त्यांना बघण्यासाठी उभे होते. गाडी थांबली तसे रेटारेटी करुन लोक कोण आहे उमेदवार म्हणून पहात होते. शेवटी सुनील काटकरांनी बिचुकलेंना गाडीबाहेर काढले. आपली जुल्फे सावरत बिचुकले टाचा उडवत कडेगाव तहसीलदारांसमोर उभे ठाकले आणि झटक्यात त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. बिचुकल्यांचा अर्ज मागे घेतला गेला आणि बाहेर जल्‍लोष झाला. ज्या चालकाने गाडी वेळेपूर्वी पोहोचवली त्या प्रविण कणसे यांना 10 हजाराचे बक्षीस लागलीच देण्यात आले.  विश्‍वजित बिनविरोध निवडून आले त्यांनी काटकरांना व बिचुकल्यांनाही जोरदार मिठी मारली. शेवटी कडेगाव पलूसच्या लढाईत सातारचा अभिजीत बिचुकले नावाचा मावळा कामी आला.