Sat, Jul 20, 2019 15:48होमपेज › Satara › सातार्‍यात तोडफोड; बंद कडकडीत

सातार्‍यात तोडफोड; बंद कडकडीत

Published On: Jan 04 2018 1:04AM | Last Updated: Jan 03 2018 10:46PM

बुकमार्क करा
सातारा : प्रतिनिधी

भीमा कोरेगाव, जि. पुणे येथील घटनेच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदला  सातार्‍यात हिंसक वळण लागले. शहरात दुकान, रिक्षा व हॉटेलची तोडफोड करण्यात आली. जिल्ह्यात  बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ठिकठिकाणी मोर्चे निघाले, निदर्शने व रास्ता रोकोही झाला. वडूज येथे दोन गट एकमेकांसमोर भिडल्याने तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली. तर मेढ्यातही बंद संयोजक व व्यापार्‍यांमध्ये तणातणी झाली. दरम्यान, शहरी व ग्रामीण भागामध्ये वादावादी व बाचाबाचीच्या घटना घडल्या. एस. टी., रिक्षा, वडाप सेवा पूर्णपणे ठप्प झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले.

भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ भारिप बहुजन महासंघाने बंद पुकारला होता. सातार्‍यात या बंदमध्ये रिपाइं, रासप व विविध संघटना सहभागी झाल्या होत्या. सातार्‍यात बंद संयोजकांच्या वतीने सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी धरणे आंदोलनही झाले. ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो’, ‘जातीयवाद्यांचा निषेध असो’, ‘एकच कडक.. निळा भडक’, ‘जोर से बोलो.. जय भीम बोलो’, अशा घोषणा देत मोर्चेकर्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन केले. दिवसभर हे आंदोलन सुरू होते.

बंदचे आवाहन करत काही कार्यकर्ते शहरातून फिरत होते. शहरातील नेहमी गजबजणार्‍या पोवईनाका, राजवाडा, मध्यवर्ती बसस्थानक,  विसावा नाका, गोडोली नाका, मोळाचा ओढा परिसरातील व्यापारी व विक्रेत्यांनी बंदला प्रतिसाद देत आपापले व्यवसाय बंद ठेवले. यादरम्यानच करंजे परिसरात आंदोलकांकडून रिक्षाची तोडफोड करण्यात आली. तर सदाशिव पेठेतील एका दुकानाचे नुकसान करण्यात आले. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर असणार्‍या प्रीती हॉटेल परिसरात लावण्यात आलेल्या चार चाकी वाहनांवर व आयसीआयसीआय बँकेच्या शटरवरही दगडफेक करण्यात आली. यामध्ये वाहनांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, शिवथर येथेही या घटनेच्या निषेधार्त रस्ता रोको करून घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनामुळे काही वेळ सातारा-लोणंद रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. 

दिवसभर सातारा शहरात तणाव सदृश  वातावरण निर्माण झाले होते. सर्व रस्ते ओस पडल्याने वर्दळ कमी झाली होती. शाळांनाही सुट्टी देण्यात आली होती. या बंदचा परिणाम एस. टी., वडाप, रिक्षा आणि खासगी वाहतुकीवर झाला. जावली तालुक्यात कुडाळ, करहर, केळघर या भागात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तर मेढ्यात दुपारी 1 नंतर बाजारपेठ सुरू करण्यावरून आंदोलक व व्यापार्‍यांमध्ये वादावादी झाली. यामध्ये पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर बाजारपेठ सुरू करण्यात आली.

फलटणमध्येही विविध संघटनांच्यावतीने शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला. तसेच एस. टी. सेवाही बंद करण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. वडूजमध्ये आंदोलकांनी निषेध रॅली काढली. दुपारी जबरदस्तीने दुकाने बंद करण्याचा प्रयत्न केल्याने दोन गटात बाचाबाची झाली. त्यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. याचबरोबर महाबळेश्‍वर येथे विविध संघटनांनी एकत्रित येऊन शांततेत मोर्चा काढून निषेध व्यक्त केला.  पाचगणीतही व्यापार्‍यांनी सकाळपासूनच दुकाने बंद ठेवली होती. 

खटाव तालुक्यात मंगळवारी रात्री 10 वाजता ललगुण येथे एस. टी. बसच्या काचा फोडल्या. तर विविध दलित संघटनांनी पुसेगावमध्ये रॅली काढून शिवाजी चौकात घटनेचा निषेध नोंदवला. तालुक्यात एस. टी. सेवा पूर्ण पणे बंद केल्याने विद्यार्थ्यांचे नागरिकांचे हाल झाले. दरम्यान, जिल्ह्यातील 11 आगारातील  ग्रामीण भागासह लांब पल्याच्या मार्गावर धावणार्‍या सुमारे 400 हून अधिक एसटीच्या फेर्‍या रद्द झाल्या. बंदमुळे एसटीची चाके काही काळ थांबली. त्यामुळे अनेक प्रवाशांना बसस्थानकात ताटकळत थांबावे लागले.

तोडफोडप्रकरणी सात युवक ताब्यात

बंद काळात ठिकठिकाणी दगडफेक झाल्याने गालबोट लागले असून, पोलिसांनी या प्रकरणी सुमारे सात युवकांना ताब्यात घेतले आहे. तोडफोडीमध्ये दुकान, वाहने, शोरूम, हॉटेल टार्गेट झाली असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, बुधवारी सकाळपासूनच पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात होता.  

दहा आंदोलकांवर गुन्हा

मंगळवारी सायंकाळी सदरबझार येथे एसटी बस रोखल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात 10  जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. जयवंत वटणे व प्रदीप कांबळे यांच्यासह 10 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी मिलिंद वसंत ढवळे या एसटी चालकाने तक्रार दिली आहे.