Thu, Apr 25, 2019 07:31होमपेज › Satara › पाचगणीत पावसाळी पर्यटनास बहर

पाचगणीत पावसाळी पर्यटनास बहर

Published On: Jul 15 2018 1:30AM | Last Updated: Jul 14 2018 10:21PMभिलार : वार्ताहर 

पाचगणी व भिलार परिसरात पावसाची संततधार सुरु असून धुक्यासह हवेत गारवा निर्माण झाला आहे. सुट्टीच्या निमित्ताने पर्यटक मोठ्या संख्येने पाचगणीत येत असल्याने पावसाळी पर्यटनास बहर आला आहे.

पाचगणी परिसरात पावसाने धडाक्यात हजेरी लावल्याने पर्यटन स्थळावरील वातावरण चिंब झाले आहे. रिमझिम पाऊस, अंगाला झोबणारा खट्याळ वारा आणि हिरवा निसर्ग, मुक्त हस्तपणे कोसळणारे धबधबे, शहर परिसरात उमललेली विविधांगी फुले आणि हिरव्यागार डोंगररांगाचं सौंदर्य टिपण्यासाठी निसरड्या वाटा धुंडाळताना पर्यटक दिसत आहेत. निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक दुचाकी, चारचाकीमधून मोठ्या संख्येने येत आहेत. त्यामध्ये लहान मुले, युवक-युवती, नवविवाहित जोडपी तसेच वृद्धांचा समावेश आहे.

येथील सुप्रसिद्ध टेबल लँड, पारसी पॉईंट, सिडने पॉईंट, ऑन व्हील्स, भिलार वॉटर फॉल आदी ठिकाणी पर्यटक भेट देऊन पर्यटनाचा आनंद लुटत आहेत. पारसी पॉईंट, टेबल लँड येथून धोम जलाशयाचे विहंगम दृश्य पाहण्यात पर्यटक मश्गुल आहेत.

मुंबईहून महाबळेश्‍वरकडे येणार्‍या घाटात मेटतळे येथे कोसळणारा विहंगम धबधबा, भिलार वॉटर फॉल, लिंगमळा धबधबा तसेच पसरणी घाट व डोंगररांगांतून कोसळणार्‍या छोट्या मोठ्या धबधब्यांखाली भिजण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत. सध्या पाचगणी परिसरात विविध रंगांची आलेली फुले, रानफुले पाहण्यासाठी काही पर्यटक निसर्ग सफर करत आहेत. 

या धुंद वातावरणात गरमागरम चहा, मक्याची कणसे, आईस्क्रीमचा आस्वाद पर्यटक घेत आहेत. डोंगररांगा हिरव्या शालीने लपेटल्याने सौंदर्याने आणखी खुलून दिसत आहेत. त्यामुळे धुके, पाऊस व थंडी अशा हटके वातावरणात पर्यटकांची पावले मात्र पाचगणीकडे वळत आहे.