Wed, Apr 24, 2019 01:40होमपेज › Satara › पाचगणीत पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस

पाचगणीत पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस

Published On: May 22 2018 10:40PM | Last Updated: May 22 2018 10:26PMभिलार : वार्ताहर

पाचगणी (ता. महाबळेश्‍वर) येथे पिसाळलेल्या कुत्र्याने शहरात 12 जणांंवर हल्ला करून चावा घेतला. त्यामुळे शहर व परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. श्‍वानाने चावा घेतलेल्या रुग्णांवर पाचगणी येथील रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना सातारा येथील क्रांतिसिंह रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. 

मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास या पिसाळलेल्या कुत्र्याचा तायघाट परिसरात धिंगाणा सुरू होता. त्या ठिकाणी तीन-चार जणांना चावल्यानंतर बेभान झालेले हे कुत्रे मुख्य मार्गाने पाचगणीत दाखल झाले. या ठिकाणी शहरातील विविध परिसरात नागरिकांना  चावले. काही रुग्णांनी तातडीने पाचगणीतील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी धाव घेतली. दवाखान्यात रेबीज लसीची कमतरता असल्याने डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी रुग्णांना सातारा येथे पाठवले. 

या घटनेने पाचगणी परिसरात संतापाची लाट उसळली आहे. पाचगणी येथे उपचार करून सातारा येथे पाठविलेल्या रुग्णांमध्ये जनाबाई सुरेश बेलोशे (वय 42), आनंदी रमेश कासुर्डे (वय 30), बालसिंग बंडू कथालीन (वय 21), राजाराम महादेव ओंबळे (वय 30), गणेश शांताराम कासुर्डे (वय 28), रोहन विठ्ठल बेलोशे (वय 22), श्रुती निलेश खरात (वय 34), संकेत ठोके (वय 38) यांचा समावेश आहे. या सर्वांना हात, पाय या ठिकाणी कुत्र्याने चावा घेतला आहे.

आठ जखमींना उपचारासाठी पाचगणी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केले. मात्र, रेबीज लस उपलब्ध नसल्याने त्यांना वाई व सातारा येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले. 

जखमींना उपचारासाठी पाचगणीतील सेव्ह अवर सोल (एसओएस) ग्रुप व भंडारी चॅरिटेबल ट्रस्टने मानवतावादी दृष्टीने रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली व त्यांना  सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.