Sun, Apr 21, 2019 14:11होमपेज › Satara › पाचगणी नगरपालिकेला फोर लिव्हझ अ‍ॅवॉर्ड

पाचगणी नगरपालिकेला फोर लिव्हझ अ‍ॅवॉर्ड

Published On: Jun 09 2018 10:55PM | Last Updated: Jun 09 2018 10:21PMभिलार /पाचगणी : वार्ताहर 

दिल्ली येथील विज्ञान आणि पर्यावरण केंद्राच्यावतीने घनकचरा निर्मूलनाचे उत्कृष्ट काम केलेल्या पाचगणी गिरिस्थान नगरपालिकेला फोर लिव्हझ अ‍ॅवॉर्ड देऊन नुकतेच गौरविण्यात आले. दिल्ली येथे पार पडलेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार केंद्राचे सहसंचालक चंद्र भूषण यांच्या हस्ते नगराध्यक्षा सौ. लक्ष्मी कर्‍हाडकर यांना प्रदान करण्यात आला. 

स्वच्छ भारत अभियानांतर्गत भारतातील सुमारे 4400 नगरपालिकांमधून पश्चिम विभागातून प्रथम क्रमांक पटकाविलेल्या पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदेच्या यशोगाथेचा झेंडा दिल्ली दरबारी फडकला. दिल्ली येथील विज्ञान आणि पर्यावरण केंद्राच्यावतीने स्वच्छतेत दिशादर्शक व आश्वासक काम करणार्‍या 18 राज्यातील बेंगलोर, छत्तीसगड, वेंगुर्ला, अशा 20 नगरपालिकांच्या पदाधिकारी व कर्मचार्‍यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेत पाचगणी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ. लक्ष्मी कर्‍हाडकर यांनी पालिकेने ओला व सुका कचरा वर्गीकरण, ‘स्वच्छ भारत पॉईंट’ या प्रकल्पाविषयीची माहिती सादर करून सर्वांनाच प्रभावित केले.

सौ. लक्ष्मी कर्‍हाडकर म्हणाल्या, दिल्ली ही देशाची राजधानी असून या शहराच्या एका प्रभागाएवढी पाचगणीची लोकसंख्या आहे. देशातील नावाजलेले पर्यटनस्थळ म्हणून हे जगप्रसिद्ध असल्याने कचरा निर्मूलनाची मोठी जबाबदारी पालिका प्रशासनावर असल्याने आम्ही फक्त घनकचरा निर्मूलनावर आग्रही राहिलो. यासाठी प्रत्येक कुटुंबाला ओला व सुक्या कचर्‍यासाठी दोन वेगवेगळ्या बकेट देऊन ओला व सुका कचरा वर्गीकरणाची लोकांना सवय लावली. पुढे हा कचरा डेपोवर उभारलेल्या स्वच्छ भारत पॉइंटच्या माध्यमातून गांडूळ खत व त्यानंतर या कचरा डेपोचे रूपांतर बाग बगिच्यात झाल्याने पर्यटकांनाही आश्‍चर्य वाटले. पाचगणी पालिकेने स्वच्छ भारत अभियानात देशात पश्चिम विभागात प्रथम क्रमांक पटकावला या पार्श्वभूमीवर कर्‍हाडकर यांनी पालिकेच्या कचरा निर्मूलन कामाचे उत्कृष्टरित्या सादरीकरण केल्याने सर्व उपस्थितांनी त्यांचे उभे राहून टाळ्या वाजवत त्यांना दाद दिली. सौ. कर्‍हाडकर पुढे म्हणाल्या, मोठ्या शहरांना निधीची कमतरता नसल्याने स्वच्छतेत काम करण्यासाठी त्यांना कसलीही अडचण येत नाही परंतु छोट्या शहरांना निधीसाठी खूपच संघर्ष करावा लागतो. त्यामुळे आम्ही कचर्‍यावर प्रक्रिया करण्याचा आधुनिक प्रकल्प उभा केला.  अशा कार्यशाळेतून मिळालेला अनुभव पुढील कामासाठी अधिक बळ देणारा आहे त्यामुळे या पुढील काळात घनकचरा व्यवस्थापन व त्यातून मिळणारी उत्पादने यांच्या अभ्यासासाठी आपण विविध ठिकाणांना भेटी देणार आहोत. सादरीकरण आणि विशेष गौरवाबद्दल नगराध्यक्षा सौ. कर्‍हाडकर व सर्व सहकारी नगरसेवक, पालिका कर्मचारी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.