Fri, Jan 18, 2019 23:24होमपेज › Satara › वीज कोसळून १६ जनावरे दगावली

वीज कोसळून १६ जनावरे दगावली

Published On: Apr 19 2018 1:37AM | Last Updated: Apr 18 2018 10:36PMफलटण : प्रतिनिधी

फलटण शहर व परिसरात मंगळवारी पाऊस झाला. मात्र, त्यापूर्वी झालेल्या वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटामुळे चारा आणि अन्य पिकांचे नुकसान झाले. तर एक म्हैस, 14 शेळ्या आणि एक मेंढरू वीज पडल्याने दगावले. या घटनेत 2 कुटुंबांचे सुमारे 2.75 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. 

मंगळवारी तालुक्याच्या पूर्वभागातील आसू, पवारवाडी, गोखळी, राजाळे, विडणी परिसरात मोठ्या प्रमाणावर वादळ वारे आणि दमदार पाऊस झाला आहे. तर तालुक्याच्या पश्‍चिम भागात हलका पाऊस झाला आहे. विजांच्या कडकडाटामुळे निंबळक (ता. फलटण) येथे घरासमोर बांधलेल्या दोन म्हशीपैकी एका म्हशीवर वीज पडल्याने  म्हैस ठार झाली. यामुळे नारायण दिनकर भोसले यांचे 90 हजार रूपयांचे नुकसान झाले. तर मिरगाव येथील किसन सरक यांच्या राहत्या घरात वीज पुरवठा करणार्‍या सर्व्हीस वायरवर वीज पडली. ही वायर तुटून कंपाऊडद्वारे करण्यात आलेल्या गोठ्याच्या तारेवर या वीजेचा प्रवाह गेला. शेळ्या व मेंढरू हे या कुंपणात फिरत होते. या घटनेत 14 शेळ्या आणि 1 मेंढरू मृत्यूमुखी पडले. यामध्ये सरक यांचे 1 लाख 76 हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. 

वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता कुंभार यांनी पंचनामा केला. तसेच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार रामदास लिमण व राऊत यांनीही घटनास्थळास भेट देवून पंचनामा केला आहे.  

दरम्यान, आसू, पवारवाडी, राजाळे, विडणी परिसरात झालेल्या वादळवारे व पावसाने शेतातील पिके जमीनदोस्त झाली. तर गंजीचेही नुकसान झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. उन्हाळ्यासाठी ठेवलेला हिरवा चारा संपल्यामुळे शेतकर्‍यांना आता विकतचा चारा घ्यावा लागणार आहे. त्याचबरोबर आसू-तावशी या रस्त्यावर पडलेल्या झाडांमुळे वाहतुक खोळंबली होती.