Sun, May 26, 2019 10:51होमपेज › Satara › अपूर्व उत्साहात बावधनचे बगाड 

अपूर्व उत्साहात बावधनचे बगाड 

Published On: Mar 06 2018 10:46PM | Last Updated: Mar 06 2018 10:45PMवाई : प्रतिनिधी

संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असणारी बावधन येथील ऐतिहासिक व पारंपरिक बगाड यात्रा मंगळवारी ‘काशीनाथाचं चांगभलं’च्या गजरात लाखो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली. 
बावधन येथील भैरवनाथाचे बगाड गावाच्या पूर्वेस सुमारे पाच किलोमीटर अंतरावरील सोनेश्‍वर याठिकाणी सकाळी 8 च्या सुमारास पोहोचले. त्यानंतर बगाड्या मनोज सपकाळ यास कृष्णा नदीत विधीवत स्नान घालण्यात येऊन त्यानंतर देवदेवतांची विधीवत पूजा-आरती करण्यात आली. बगाड्याला वाजत गाजत बगाडाजवळ नेण्यात आले. त्याला पारंपरिक पद्धतीचा पोशाख घालून बगाडास टांगण्यात आले. यावेळी भाविकांनी नोटांची व नारळाची तोरणे, झेंडे, नवसाचे गोंडे बगाडास बांधले होते. 

बगाडाचा गाडा ओढण्यास सकाळी 11 च्या सुमारास सुरुवात झाल्यानंतर ठिकठिकाणी विसावा घेऊन बैल बदलण्यात आले. बगाडाबरोबर वाघजाईदेवी, भैरवनाथ आणि ज्योतिबाच्या पालख्यांचेही भाविकांनी दर्शन घेतले. बगाड वाई-पाचवड रस्त्यावर बावधन फाट्यावर दुपारी 3.30 च्या सुमारास पोहचले. तेथे रस्त्याच्या दुतर्फा हॉटेल, मिठाई, खेळणी, थंडपेयांची व फळांची दुकाने आदी थाटण्यात आली होती. वाई व परिसरातील हजारो भाविकांनी बगाड पाहण्याचा आनंद लुटला व दर्शन घेतले.

गाडा गावाच्या दिशेने जात असताना ठिकठिकाणी शिडाच्या पाच फेर्‍या काढण्यात आल्या. बगाड परिसरात मुंबईच्या व स्थानिक विविध संस्था, मंडळांनी भाविकांच्या सोईसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली होती. वाई व बावधन प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक तैनात करण्यात आले होते. वाई नगरपरिषदेचे अग्निशामक वाहन बावधन हायस्कूल येथे सज्ज ठेवण्यात आले होते. 

सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बगाड गावात पोहचले. यावेळी वाद्यांचा गजर करण्यात आला. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले  यांनीही बावधनच्या बगाड यात्रेस हजेरी लावली. यात्रेवर नियंत्रण ठेवण्यासाठी ट्रॅक्टरवर लाऊडस्पीकरची सोय करून कृषीभुषण शशिकांत पिसाळ, दिलीप पिसाळ, सरपंच सतीश पिसाळ, राजू कदम, पोलीस पाटील अशोक भोसले, मदन भोसले आदी मान्यवर ध्वनिक्षेपकावरून सूचना देत होते.  भाविकांनी दिलेल्या देणग्यांचा पुकारा यावेळी करण्यात येत होता. महसूल विभागाच्यावतीने प्रांताधिकारी अस्मिता मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार अतुल म्हेत्रे, नायब तहसिलदार पिसाळ व कर्मचारी यात्रेवर लक्ष ठेवून होते.

पोलीस उप अधिक्षक अजित टिके, वाईचे पोलीस निरीक्षक विनायक वेताळ यांच्या मार्गदर्शनाखाली बबन एडगे,  पी. एस. कदम, शिरीष शिंदे, व 60 पोलीस कर्मचारी, एक जलद कृतीदलाची तुकडी असा पोलिस बंदोबस्त यात्रेसाठी तैनात करण्यात आला होता.