Thu, Apr 18, 2019 16:03होमपेज › Satara › साताऱ्यात बँकेत रोकडवर डल्ला

साताऱ्यात बँकेत रोकडवर डल्ला

Published On: Jun 18 2018 2:52PM | Last Updated: Jun 18 2018 2:52PMसातारा : प्रतिनिधी

सातारा शहरातील एका बँकेतून अज्ञाताने बँकेचा कर्मचारी असल्याचे सांगून खात्यामध्ये पैसे भरुन देतो, असे सांगून ४९ हजार रुपयांची चोरी केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बँकेमध्ये तिर्‍हाईत व्यक्ती घुसून थेट पैशांवर डल्ला मारु लागल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत प्राथमिक माहिती अशी, महेंद्र निकम (रा. सातारा) हे सोमवारी सकाळी जिल्हा शासकीय रुग्णालय परिसरातील एका बँकेत पैसे भरण्यासाठी गेले होते. पैसे भरण्यासाठी स्लिप पाहत असतानाच एक अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ गेली. निकम यांच्याकडे चौकशी करत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. यावेळी निकम अज्ञाताला काय हवे आहे? असे विचारताच अज्ञाताने थेट बँकेचा कर्मचारी असल्याचे सांगून तुम्हाला मदत करतोय असे सांगितले, अशाप्रकारे विश्वास संपादन करुन पैसे भरण्यासाठी स्लिप भरुन दिल्यानंतर अज्ञाताने फसवणूक करुन जबरदस्तीने निकम यांचे ४९ हजार रुपये चोरुन नेले.

अज्ञाताने पैसे बँकेत न भरता तो घेवून पळत जात असताना महेंद्र निकम यांनी आरडाओरडा केला. मात्र संशयिताने तेथून पळ काढला. अचानक घडलेल्या या घटनेने बँकेसह परिसरात खळबळ उडाली. तत्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक माहिती घेवून तक्रारदार यांना शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास सांगितले.