Mon, Mar 25, 2019 05:26
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › बामणोली पोलिस चौकीचा प्रश्‍न पेटणार

बामणोली पोलिस चौकीचा प्रश्‍न पेटणार 

Published On: Feb 15 2018 10:08PM | Last Updated: Feb 15 2018 7:41PM बामणोली : निलेश शिंदे

मेढा पोलिस स्टेशन अंतर्गत सुरू असणारे बामणोलीचे पोलिस आऊट पोस्ट गेल्या कित्येक वर्षांपासून तापोळा या ठिकाणी सुरू आहे. मात्र, येथील पोलिस चौकी कासला हलवण्याचा घाट काहीजणांकडून घातला जात आहे. त्यामुळे हा प्रश्‍न पेटण्याची चिन्हे असून बामणोली परिसरातील गावे आक्रमक झाली आहेत. पोलिस चौकी कासला हलवल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे.  जावली तालुक्यातील काही गावे महाबळेश्‍वर तालुक्यात प्रशासनाने वर्ग केली असून त्यानंतर या गावांचा पोलीस स्टेशनचा कारभार हा  बामणोलीच्या नावावर कार्यरत असणार्‍या तापोळा आऊट पोस्टकडेच ठेवण्यात आला. तेव्हापासून आजपर्यंत बामणोली परिसरातील  जनतेने बामणोलीला पोलीस चौकी  व्हावी, असा आग्रह धरला होता   व   बामणोली ग्रामपंचायतीने तसा संबंधित वरिष्ठ कार्यालयात पत्रव्यवहारदेखील केला आहे.

मेढ्याचे माजी पोलीस निरीक्षक समाधान चवरे यांनी बामणोली येथे चौकीकरता जागेची पाहणी देखील केली होती.  तशी जागा बामणोली ग्रामपंचायतीने उपलब्धदेखील करून दिली होती. मात्र, वरिष्ठ अधिकार्‍यांनी याचा पाठपुरावा करण्याकामी दुर्लक्ष केले. मात्र,  गावातील   जनतेच्या हिताच्यादृष्टीने व दळणवळणाच्यादृष्टीने बामणोलीला चौकी होणे अत्यंत गरजेचे आहे. वाकी, फुरुस, निपाणी, हातरेवाडी, आपटी, शिवाजीवाडी आपटी,  केळघर, सोळशी, तेटली, शिवाजीवाडी, सावरी, म्हावशी, बामणोली आश्रमशाळा, साईनगर दंडवस्ती, बामणोली, पावशेवाडी, मजरे शेंबडी, देवाची शेंबडी, वाघळी, विनायकनगर, मुनावळे, कळकोशी, आंबवडे, कारगाव, फळणी, चोरगे उंबरी, जाधव उंबरी, अंधारी, कास, कोळघर, सह्याद्रीनगर, तेटली मुरा, आपटी मुरा इत्यादी गावे व वाडी वस्त्यांचा समावेश हा बामणोली चौकीत होणार आहे.

यातील बहुसंख्य गावे ही शिवसागराच्या जलाशय किनारी असल्याने त्यांना बोटीतून ये-जा करणे सोयीचे होणार आहे. काहींनी पोलिस चौकीचा घाट हा बामणोलीऐवजी    कास तलाव परिसरात करण्याचा घाट घातला असल्याचे बोलले जाते. मात्र, कास तलावाजवळची पोलीस चौकी ही जनतेच्या हितासाठी की कास पठारावरील फुलांच्या सरंक्षणासाठी? की कास तलाव परिसरात चालणार्‍या ओल्या पार्ट्याना संरक्षण देण्यासाठी? असा देखील प्रश्‍न  गावची जनता प्रशासनाला विचारत आहे. कासला पोलीस चौकी करण्याऐवजी बामणोलीला पोलीस चौकी करून दोन स्वतंत्र पोलीस हवालदारांची कास तलाव व कास पठार परीसरात नियुक्ती करा, अशी देखील मागणी होत आहे.

कासला पोलीस चौकी झाल्यास आगीतून उठून फुफाट्यात पडल्यासारखी अवस्था बामणोली भाग  गावातील जनतेची होणार आहे. पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी बामणोली भागातील गावांच्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून नंतरच निर्णय घेण्यात यावा जेणेकरून या भागातील जनतेचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न मार्गी लागण्यास मदत होणार आहे. तेव्हा बामणोलीलाच पोलीस चौकी करा, अशी मागणी  गावातील ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.