Mon, Jul 22, 2019 13:12होमपेज › Satara › बावधन येथील बगाड यात्रेला लाखों भाविकांची उपस्थिती(व्हिडिओ)

बावधन येथील बगाड यात्रेला लाखों भाविकांची उपस्थिती(व्हिडिओ)

Published On: Mar 06 2018 8:03PM | Last Updated: Mar 06 2018 8:03PMवाई : प्रतिनिधी

संपूर्ण राज्यात प्रसिध्द असणारी बावधन येथील ऐतिहासिक व पारंपारिक बगाड यात्रा शुक्रवारी ‘काशीनाथाचं चांगभलं’च्या गजरात लाखो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली. 

बावधन येथील भैरवनाथाचे बगाड गावाच्या पूर्वेस सुमारे पाच किलोमीटर अंतरावरील सोनेश्वर याठिकाणी सकाळी 8 च्या सुमारास पोहचले. त्यानंतर बगाड्या मनोज सपकाळ यास कृष्णा नदीत विधीवत स्नान घालून त्यानंतर देवदेवतांची विधिवत पूजा आणि आरती करण्यात आली. बगाड्याला वाजत गाजत बगाडाजवळ नेण्यात आले. त्याला पारंपारिक पध्दतीचा पोषाख घालून बगाडास टांगण्यात आले. यावेळी भाविकांनी नोटांची व नारळाची तोरणे, झेंडे, नवसाचे गोंडे बगाडास बांधले होते. 

बगाडाचा गाडा ओढण्यास सकाळी 11 च्या सुमारास सुरूवात झाल्यानंतर ठिकठिकाणी विसावा घेऊन बैल बदलण्यात आले. बगाडाबरोबर वाघजाईदेवी, भैरवनाथ आणि ज्योतिबाच्या पालख्यांचेही भाविकांनी दर्शन घेतले. बगाड वाई-पाचवड रस्त्यावर बावधन फाट्यावर दुपारी 3.30 च्या सुमारास पोहचले. तेथे रस्त्याच्या दुतर्फा हॉटेल, मिठाई, खेळणी, थंडपेयांची व फळांची दुकाने आदी थाटण्यात आली होती. वाई व परिसरातील हजारो भाविकांनी बगाड पाहण्याचा आनंद लुटला व दर्शन घेतले.

गाडा गावाच्या दिशेने जात असताना ठिकठिकाणी शिडाच्या पाच फेर्‍या काढण्यात आल्या. बगाड परिसरात मुंबईच्या व स्थानिक विविध संस्था, मंडळांनी भाविकांच्या सोईसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली होती. वाई व बावधन प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक तैनात करण्यात आले होते.