होमपेज › Satara › स्वातंत्र्यापासून ‘खडीचा मारूती’ उपेक्षितच

स्वातंत्र्यापासून ‘खडीचा मारूती’ उपेक्षितच

Published On: Mar 06 2018 1:55AM | Last Updated: Mar 06 2018 12:03AMचाफळ : राजकुमार साळुंखे

समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापन केलेल्या आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिंगणवाडीतील (ता. पाटण) ‘खडीचा मारूती’ मंदिरापर्यंत जाण्यासाठी स्वातंत्र्यानंतरच्या सहा दशकात साधा रस्ताही होऊ शकलेला नाही. चाफळच्या नैऋत्येस सुमारे एक किलोमीटर अंतरावरील असणार्‍या या ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळाला दरवर्षी राज्यभरातील लाखो भाविक भेट देतात. मात्र रस्ता नसल्याने भाविकांना पायपीट करावी लागत आहे. त्याचबरोबर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून भाविकांच्या वाहनांचेही मोठे नुकसान होत आहे. 

पाटण तालुक्यातील चाफळमध्ये ऐतिहासिक श्रीराम मंदिर आहे. याशिवाय समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापन केलेली प्रसिद्ध ‘अकरा मारूतीं’पैकी दोन मारूती मंदिरे याच राम मंदिर परिसरात आहेत. तर याठिकाणापासून एक किलोमीटर अंतरावरील शिंगणवाडीच्या टेकडीवर ‘खडीचा मारूती’ मंदिर आहे. या मारूतीला ‘बाल मारूती’ही म्हणून ओळखले जाते. समर्थ रामदास स्वामी यांनी चाफळ येथे मुख्य मठ स्थापन करण्यापूर्वी शिंगणवाडी येथील याच ठिकाणी समर्थांचा मठ होता. छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी या ‘गुरू - शिष्या’ची भेट याच परिसरात झाल्याची अख्यायिकाही प्रसिद्ध आहे. भेटीवेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून गुरूदक्षिणा म्हणून मिळालेले होन येथे जमलेल्या लोकांवर उधळले होते आणि त्यातील काही नाणीही या परिसरात सापडत होती, असेही बोलले जाते.

त्याचबरोबर या परिसरातच समर्थांचे चिंतनाला बसण्याचे ठिकाण असून याला ‘रामघळ’ म्हणून ओळखले जाते. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांची तहान भागवण्यासाठी समर्थांनी आपल्या कुबडीने दगड उलथवून दगडाखाली दाखवलेला पाण्याचा झराही याच परिसरात असून हे ठिकाण ‘कुबडी तीर्थ’ म्हणून ओळखले जाते. अशा प्रकारे शिंगणवाडी, चाफळ परिसराला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व आहे. हनुमान जयंतीला शिंगणवाडी ग्रामस्थांकडून खडीचा मारूती येथे मोठा उत्सवही साजरा केला जातो. याशिवाय श्रावण महिन्यात राज्यभरासह देशभरातील लाखो लोक दरवर्षी या ठिकाणी दर्शनासाठी येतात. श्रावणाशिवाय वर्षभरही भाविकांची रेलचेल सुरूच असते. 

मात्र असे असूनही स्वातंत्र्याला सहा दशकांचा कालावधी उलटूनही ‘खडीच्या मारूती’ मंदिरापर्यंत वाहनातून आजही जाता येत नाही. मंदिर ज्या टेकडीवर आहे, त्या टेकडीपर्यंत जाण्यासाठी अस्तित्वात असलेल्या मार्गावरही तीन ते चार फूट खोलीचे खड्डे पडले आहेत.  दर्शनासाठी येणार्‍या भाविकांमध्ये वयोवृद्ध भाविकांचे प्रमाण लक्षणीय असते. याशिवाय टेकडीखाली वाहन पार्किंगची कोणतीही सोय नाही. वाहन वळवतानाही चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.

यापूर्वीही दैनिक ‘पुढारी’ने याबाबत आवाज उठवला होता. मात्र त्यानंतरही आजवर रस्त्याचा प्रश्‍न मिटलेला नसल्याने भाविकांसह स्थानिक ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे.