Sun, Aug 25, 2019 03:35होमपेज › Satara › रस्त्यांवर कोसळलं आभाळ; खड्ड्यांनी केलं बेहाल

रस्त्यांवर कोसळलं आभाळ; खड्ड्यांनी केलं बेहाल

Published On: Jul 07 2018 1:37AM | Last Updated: Jul 06 2018 10:39PMसातारा : आदेश खताळ

सातारा शहराच्या विकासावर झालेल्या खर्चाचे आकडे फुटू लागले आहेत. नवनव्या योजनांचे ढोल वाजवले जात आहेत. सातार्‍यात भुयारी गटर योजनेचे काम केल्याशिवाय रस्त्यांची कामे होणार नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. सातार्‍यातील रस्त्यांची गेली आठ दिवसांपासून धो-धो कोसळणार्‍या पावसाने वाट लावली.  खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने सातार्‍यातील रस्त्यांवर जणू आभाळच कोसळलं. ‘ऊंट की सवारी’चा अनुभव  येत  असताना नगरपालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने सातारकरांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

सातारा शहरात 700 कोटींची कामे केल्याची चर्चा गेल्याच महिन्यात झाली. ही कामे कुठे झाल्याचे निदर्शनास येत नसल्याने हा निधी कुठे खर्च झाला म्हणून पोलिसात एफआयआर  दाखल करण्याची तयारी दाखवली गेली. कोट्यवधींची कामे कुणी दाखवली नाहीत आणि एफआयआर पण दाखल झाला नाही. असो, पण  त्यानंतर शहरात 100 कोटींचे म्हणजे अब्जावधींचे रस्ते केले जाणार असल्याचे सुतोवाच केले गेले. त्यामध्ये शहरातील  राजपथ, कर्मवीर पथ (खालचा रस्ता),  बोस चौक-जुना आरटीओ चौक व अन्य दोन रस्ते अशा पाच प्रमुख रस्त्यांचा समावेश असल्याचे सांगितले गेले.  मात्र, शहरातील विकास साधण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या योजना परस्परांवर अवलंबून आहेत, हे कुणीच ‘इस्कटून’ सांगितले नाही. शहरात भुयारी गटर योजना प्रस्तावित आहे. मात्र, ही योजना राबवताना दरमाणसी पाण्याचा वापर ठरवून देण्यात आला आहे. सध्याचा पाणी वापर हा योजनेतील निकषापेक्षा कमी आहे. त्यामुळे भुयारी गटर योजना अजून अपूर्ण आहे. ही योजना साकारत असताना वाढीव पाणीपुरवठा योजना राबवली. पाच वर्षांपूर्वीच तिची मुदत संपली.  जी गेली दहा वर्षांपासून सुरूच आहे. त्यातील भाग म्हणजे कास धरणाची उंची वाढवणे आहे. ही कामे मार्गी लागणार नाहीत, तोपर्यंत भुयारी गटर योजनेचे काम पूर्ण होणार नाही. कारण योजनेचे जेवढे काम तेवढाच निधी शासनाकडून उपलब्ध करून दिला जाणार आहे. भुयारी गटरचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत 100 कोटींच्या रस्त्यांची कामे चर्चेतच राहणार आहेत.   या महत्त्वाकांक्षी योजनांना स्वनिधी उपलब्ध करून देताना सातारा पालिकेला आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. त्याचा रस्ते दुरुस्तीसारख्या कामांवरही परिणाम होत आहे. विकासकामांच्या बाबतीत अशी परिस्थिती असेल तर सातारकरांना भविष्यातील स्वप्ने दाखवून वास्तवापासून वंचित ठेवले जात आहे. ज्यावेळी अशा योजनांतील क्लिष्टता समोर येते त्यावेळी सोयीची माहिती पुढे करून गुमराह करण्याचा प्रयत्न होताना दिसतो. कामकाजातील खरेपणा समोर आणला जात नाही. विकासकामांमध्ये अशी गुंतागुंत असताना वेगळे चित्र निर्माण केले आहे. शहरात भविष्यात शंभर कोटींचे रस्ते करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, वर्तमानात उखडलेले रस्ते कधी दुरुस्त करणार? असा सातारकरांना प्रश्‍न पडला आहे.  

योजना मोठ्या असल्याने त्याला वेळ लागत आहे. योजना राबवताना रस्ते उकरावे लागणार असल्याने त्यावर पुन्हापुन्हा खर्च का करायचा? हा व्यवहारीपणाही कदाचित पालिका कारभार्‍यांकडून दाखवला जात असेल. शासनाकडून येणारा निधी आणि होणारा खर्च यांचा मेळ घालत काटकसर केली जात असली तरी सातारकरांच्या मागण्या आणि अपेक्षांचा विचार न करता आरोग्य विभाग, बांधकाम विभागातून इतर ठिकाणी मात्र अनावश्यक आणि वारेमाप  खर्च केला जातो. शॉपिंग सेंटर बांधा, म्हणून नागरिक मागणी करत नाहीत, पण चांगले रस्ते, दिवाबत्ती आणि स्वच्छतेची मागणी होत असताना त्याकडे दुर्लक्ष का होते?  या कामी प्रचंड खर्चही होतो पण प्रत्यक्षात कामांच्या बाबतीत ‘चांगभलं’  असतं.  अवाजवी कामांची बिलं निघतात मात्र, होणार्‍या कामांतून सातारकरांचं समाधान होत नाही. 

सातारा पालिकेच्या शहरातील बहुतांश रस्त्यांची दोन वर्षांपूर्वी कामे करण्यात आली. याही रस्त्यांची सध्या वाट लागल्याने या कामांबाबत साशंकतेने पाहिले जात आहे. पाणीपुरवठा योजनेसाठी खोदलेल्या या रस्त्यांच्या दुरुस्तीवेळी निधीची बरीच फिरवाफिरवी झाली. त्यामुळे रस्त्यांची कामे नगरपालिकेने की महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने केली? असे प्रश्‍न आहेतच. रस्ते खोदताना दुरुस्तीसाठी त्याच योजनेत तरतूद असल्याचे प्राधिकरणाचे त्यावेळी म्हणणे होते. तरीही नगरपालिकेने या दुरुस्तीसाठी 28 लाख दिले होते. हे काम प्राधिकरणाने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. पण काम होत नसल्याने कामासह हा निधी पुन्हा पालिकेकडे वर्ग करण्यात आला. त्यानंतर  वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून रस्त्यांची कामे झाली. वॉर्डमध्ये कामे करताना बर्‍याच रस्त्यांची कामे रखडली. त्यानंतर नगरपालिकेने पुन्हा स्वनिधीतून  रस्त्यांची कामे हाती घेतली. या सार्‍या प्रक्रियेत सावळा गोंधळ झाला.   रस्त्यांची संपूर्ण कामे झाली नाहीत. अर्धवट कामे करुन   त्याची बिले मात्र निघाल्याचे काही ठिकाणी निदर्शनास येत आहे. या परिस्थितीमुळे दोन वर्षांत पुन्हा खड्ड्यांचा अनुभव सातारकरांना येवू लागला आहे. 

पितळ उघडे
सातार्‍यात आठ दिवसांपासून पडणार्‍या पावसाने रस्ते कामातील पितळ उघडे पडले आहे. मुख्य मार्गांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. बर्‍याच ठिकाणी  सरफेस वाहून गेल्याने  रस्ते पचपच करु लागले आहेत. मंगळवार पेठ, व्यंकटपुरा पेठ, शुक्रवार पेठ, करंजे पेठ, सदरबझार, कामाठीपुरा, गोडोली, रविवार पेठेत, केसरकर पेठेतील काही अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पाणीपुरवठा विभागाने केलेल्या खोदकामांमुळे निर्माण झालेल्या खड्ड्यांनी आ वासला आहे. खोदकामानंतर रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे होत नसल्याने खड्ड्यांचे प्रमाण वाढत आहे. उन्हाळ्यात रस्त्यांची कामे केली जात नाहीत. त्यामुळे सातारकरांना पावसाळ्यात अशा खड्ड्यांचा सामना करावा लागतो. कामाचे नियोजन नसल्यामुळे दरवर्षी सातारकरांना खड्डे पडलेल्या रस्त्यातूनच जावे लागते. शंभर कोटींचे रस्ते करण्यापूर्वी रस्त्यावरील खड्डे तरी भरा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

पोवईनाक्यावर ‘एकेरी’ खड्ड्यांची ‘बेफिकिरी’
  सातार्‍यात ग्रेड सेपरेटच्या माध्यमातून चांगलं काम व्हावं म्हणून प्रत्येक सातारकर गैरसोय सहन करत आहे. वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी याठिकाणी तीन मार्ग एकेरी करण्यात आले. त्यामुळे सातारकरांना सापशिडीचा खेळ दररोज खेळावा लागत आहे. एकेरी वाहतुकीच्या मार्गावरच प्रचंड खड्डे आहेत. त्याची दुरुस्ती न करण्याची बेफिकिरी दाखवली जात असल्याने सातारकरांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोवई नाक्यावर ठिकठिकाणाहून आठ रस्ते एकत्र येतात. मात्र, या रस्त्यावर सतत वाहतुकीची कोंडी होत असल्याने वाहतुकीचा हा गुंता सोडवण्यासाठी त्याठिकाणी ग्रेड सेपरेटरचे काम हाती घेण्यात आले. सुरुवातीस वाहतुकीची फारशी गैरसोय झाली नाही. मात्र, त्यानंतर कामाचा विस्तार होत गेल्याने रस्ते अपुरे पडले.
 
सांगा..आरटीओ चौकातील ह्यो खड्डा कुणाचा?
सातारा-लोणंद राज्य मार्गाला जोडणार्‍या जुना आरटीओ चौकातील खड्डा चर्चेचा विषय ठरला आहे. अनेक वर्षांपासून हा खड्डा तशाच अवस्थेत असून सातारा पालिका तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या खड्ड्याकडे दुर्लक्ष होत आहे. हा खड्डा अपघाताला निमंत्रण देत असतानाच  संबंधित विभागांकडून हात झटकले जात असल्याने सांगा.. ह्यो खड्डा कुणाचा? अशी वाहनचालकांतून विचारणा होत आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस चौक ते जुना आरटीओ चौक या मार्गाची वाट लागली असतानाच त्यापुढे सातारा-लोणंद या मार्गाला जोडणार्‍या आरटीओ चौकातील खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या चौकात सदरबझार, जिल्हा परिषद, पोवईनाका, बसस्थानक, लोणंद याठिकाणाहून पाच रस्ते एकत्र येतात. त्यामुळे वाहतुकीचा मोठा ताण या चौकावर येत असतो. या चौकाजवळ असलेल्या पुलाजवळ सतत खड्डे असतात. मात्र, त्यापुढे मुख्य चौकात मोठा खड्डा निर्माण झाल्याने त्याठिकाणी अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. लोणंदच्या दिशेने जाताना रस्त्यातच खड्डा असल्याने वाहनचालक रस्त्याच्या दुसर्‍या बाजूने वाहन चालवतात. मात्र, इतर दिशेने येणार्‍या वाहनांमुळे अपघात होत आहेत. 

राजपथावरही सातारकरांना  होतंय ‘खड्डेदर्शन’
  सातार्‍यातील राजपथावर खड्डे राहणार नाहीत, याची काळजी सातारा नगरपालिकेने घेतली होती. मात्र, पाणीपुरवठा विभागाच्या सततच्या खोदकामामुळे राजपथालाही खड्ड्यांनी ग्रासलं. राजपथावर फारसे न  दिसणार्‍या खड्ड्यांचे सातारकरांना दर्शन घडू लागल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सातारा शहरातील राजपथ हा प्रमुख मार्ग आहे. पोवईनाका-शाहू चौक-राजवाडा या मार्गावर खड्डे पडणार नाहीत, याची काळजी दोन वर्षांपासून घेतली गेली. मात्र, गेल्याच वर्षी वाहतूक शाखेसमोर पाणीपुरवठा विभागाने खोदकाम केले. रयत शिक्षण संस्थेच्या कार्यालय परिसरातील या रस्त्यावरही ठिकठिकाणी खोदण्यात आले. शाहू चौकात उकरलेला रस्ता नीट न मुजवल्यामुळे मोठा खड्डा पडला आहे. त्याठिकाणी अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. शाहू चौक-ते कमानी हौद या मार्गावरही ठिकठिकाणी खोदण्यात आले. मोने-भोसले कॉम्प्लेक्ससमोर जलवाहिनीसाठी उकरलेला खड्डा नीट मुजवला नाही. त्यामुळे त्याठिकाणी खड्डा निर्माण झाला आहे. पाऊस आणि चिखल यामुळे या खड्ड्यांचा आकार वाढत चालला आहे. अंधारात हा खड्डा दिसत नसल्यामुळे वाहनांना दणके बसतात. याठिकाणी तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

बोस चौक-जुना आरटीओ चौक रस्ता बनला डेंजर झोन
  भविष्यात राबवण्यात येणार्‍या योजनांमुळे नेताजी सुभाषचंद्र बोस चौक ते जुना आरटीओ चौक या रस्त्याचे काम रखडवत ठेवले आहे. सध्या या ठिकाणी रस्ता उरलाच नसून  खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. सातारा-लोणंद या मार्गाला जोडणार्‍या या रस्त्याची दयनीय अवस्था होऊनही रस्त्याची दुरुस्ती केली जात नसल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

पोवईनाक्यावरील ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे एकेका रस्त्यावर वाहतुकीचा प्रचंड ताण येऊ लागला आहे. परिणामी दर्जेदार रस्ते नसल्यामुळे त्याठिकाणी लगेच खड्डे पडतात. या खड्ड्यांमध्ये पाणी साचले आणि वाहतुकीचा ताण असेल तर या खड्ड्यांचा आकार दिवसेंदिवस मोठा होत जातो. नेताजी सुभाषचंद्र बोस चौक ते जुना आरटीओ चौक या मार्गावर पेट्रोलपंपासमोर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. रस्त्याची एक बाजू संपर्णपणे उखडली आहे. जुना आरटीओ चौकाकडे जातानाही रस्ता मोठ्या प्रमाणावर उखडला आहे. त्यामुळे या परिसरात राहणार्‍या नागरिकांबरोबरच महामार्गाकडे जाणार्‍या वाहनचालकांना प्रचंड कसरत करावी लागत आहे. 

सातार्‍यातील पेठांची खड्ड्यांमुळे लागली वाट
  सातार्‍यातील मुख्य मार्गांबरोबरच अंतर्गत पेठांचीही वाट लागली आहे. दोन वर्षांपूर्वी अंतर्गत रस्त्यांची बर्‍याच ठिकाणी कामे झाली. मात्र, या कामांचा दर्जा राखला न गेल्याने अंतर्गत पेठांची प्रचंड वाट लागली आहे. शहरातील सोमवार पेठेत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. न्यू इंग्लिशजवळ खड्डे पडले आहेत. फुटक्या तळ्यावरील रस्त्यांचा सरफेस वाहून गेला आहे. यादोगोपाळ पेठेतील रस्त्यांचीही तशीच अवस्था आहे. मंगळवार पेठेतील मनामती चौकात खड्डे आहेत. शुक्रवार पेठ, करंजे पेठ, प्रतापगंज पेठ, बुधवार नाका परिसर, सदरबझार, कामाठीपुरा, गोडोली, केसरकर पेठेत रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. मुख्य मार्गांबरोबरच पेठांतील अंतर्गत रस्तेही धड नाहीत. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. दुरुस्तीकडेही नगरपालिकेचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिकांना खड्ड्यांमधूनच मार्गक्रमण करावे लागत आहे. शाळा, महाविद्यालयांनी हा परिसर गजबजलेला असतो. काही भागांमध्ये भाजी मंडई, दवाखाने, हॉस्पिटल्स आहेत. त्यामुळे पेठांतील अंतर्गत रस्त्यांवर नागरिकांची मोठी वर्दळ असते. अंतर्गत रस्त्यांची कामे होत नसल्याने नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.