Thu, Apr 25, 2019 23:24होमपेज › Satara › अडीच महिन्यांच्या बाळाची पित्याकडून हत्या

अडीच महिन्यांच्या बाळाची पित्याकडून हत्या

Published On: Jan 23 2018 1:11AM | Last Updated: Jan 22 2018 10:26PMदहिवडी : प्रतिनिधी

मूल दत्तक देण्यास नकार दिल्याच्या रागातून पतीने स्वत:च्याच अडीच महिन्यांच्या मुलास बिदाल येथे पत्नीच्या माहेरी जाऊन विषारी औषध पाजले. सातारा येथे शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान त्या दुर्दैवी बाळाचा मृत्यू झाला. याप्रकरणी दहिवडी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून संशयित पित्यास अटक करण्यात आली आहे. 

याबाबत दहिवडी पोलिस ठाण्यातून देण्यात आलेली माहिती अशी, सुरूर, ता. वाई येथील माधुरी रणजित बुलंगे या बाळंतपणासाठी माहेरी बिदाल (फुलेनगर), ता. माण येथे आल्या होत्या. त्यांना अडीच महिन्यांचा वेदांत नावाचा मुलगा होता. जन्मानंतर हे मूल दत्तक देण्याचा विचार रणजित याने व्यक्‍त केला होता. मात्र, त्यास पत्नीने विरोध दर्शवला होता. याचा राग मनात धरून अडीच महिन्यांनी रणजित सुरेश बुलंगे दि. 20 रोजी बिदाल येथे आला. त्याच रात्री त्याने बाळास कोणते तरी विषारी औषध पाजले व निघून गेला. रात्री मुलाला उलट्या होऊ लागल्या. दहिवडीत जाण्या-येण्यास वाहनांची सोय नसल्याने दुसर्‍या दिवशी सकाळी दहिवडीच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले होते.

बाळाच्या आईकडून फिर्याद

याप्रकरणी पित्यानेच आपल्या बाळास मारल्याची फिर्याद आई माधुरी बुलंगे यांनी दहिवडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून रणजित बुलंगे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आला. त्यास अटक करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. तपास स.पो.नि. प्रवीण पाटील करत आहे.