Fri, Apr 26, 2019 09:25होमपेज › Satara › पोलिसाला धडक देणार्‍या मद्यपी रिक्षा चालकाला चोप

पोलिसाला धडक देणार्‍या मद्यपी रिक्षा चालकाला चोप

Published On: Feb 23 2018 1:17AM | Last Updated: Feb 23 2018 1:17AMसातारा : प्रतिनिधी

राजपथावरील महाराजा सयाजी विद्यालयासमोर गुरुवारी रात्री रिक्षा चालकाची महिला पोलिसाला धडक बसल्यानंतर त्या रिक्षा चालकाने मद्यप्राशन केले असल्याचे समोर आल्याने संतप्त जमावाने रिक्षा चालकाला बेदम चोप दिला. या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

याबाबत अधिक माहिती अशी, सातारा पोलिस दलातील एक महिला पोलिस दुचाकीवरुन निघाली होती. सयाजी शाळेसमोर आल्यानंतर रिक्षाची त्यांना धडक बसली. या अपघातात महिला पोलिस किरकोळ जखमी झाली, त्यांना नागरिकांनी तत्काळ त्यांना बाजूला घेतले. यावेळी रिक्षा चालकाने उध्दटपणे वाद घालण्याचा प्रयत्न केल्यानंतर नागरिक त्याला त्याची चूक असल्याचे सांगत होते. दरम्यान, रिक्षा चालकाने मद्यप्राशन केले असल्याचा वास आल्यानंतर नागरिक संतप्त बनले व रिक्षा चालकाला चोप दिला.

या घटनेमुळे परिसरातील वाहतूक ठप्प झाली. याबाबतची माहिती शहर पोलिसांना समजल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रिक्षाचालकाला ताब्यात घेतले. नागरिकांना शांततेचे आवाहन करुन जमावाला घटनास्थळावरुन पांगवले. रात्री उशीरापर्यंत या घटनेची नोंद झालेली नव्हती.