Thu, Jun 20, 2019 20:41होमपेज › Satara › डिजीटल फलकांवर होणार कडक कारवाई

डिजीटल फलकांवर होणार कडक कारवाई

Published On: Dec 21 2017 1:51AM | Last Updated: Dec 21 2017 12:09AM

बुकमार्क करा

कराड : प्रतिनिधी

युवकांमध्ये वाढदिवसांच्या फलकांसह डिजीटल फलक लावण्याचे मोठे फॅड आले आहे. त्यामुळे युवकांमध्ये संघर्ष होतो. यातूनच मारामारी व खून अशा स्वरूपाचे गैरप्रकार घडत असल्याचे सांगत डिजीटल फलक लावण्यांवरच पुर्णपणे बंदी घालावी, अशी मागणी लोकांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्याकडे केली. त्यावर त्यांनी याबाबत कडक धोरण घेतले जाणार असून सार्वजनिक क्षेत्राचे विद्रुपीकरण कायद्यानुसार संबंधितावर कारवाई करण्याच्या सुचना पोलिस अधिकार्‍यांना दिल्या. यावेळी आयजींसह उपस्थितांनी पोलिसांच्या कामाचे कौतुक केले.  

कराड येथे जनता दरबारात विश्‍वास नांगरे-पाटील यांनी लोकांशी  संवाद साधला. याप्रसंगी जिल्हा पोलिसप्रमुख संदीप पाटील, पोलिस उपअधिक्षक नवनाथ ढवळे, पोलिस निरीक्षक अशोक क्षीरसागर, पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांची उपस्थिती होती. 

जनता दरबारात समस्या मांडताना लोकांनी वाढदिवसा निमित्त डिजीटल फलक लावण्यावरून प्रचंड चुरस निर्माण होऊन यातून वाद होतात. गावागावात फलक यद्ध सुरू असून ते थांबवण्यासाठी पोलिसांनी कडक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. यावर बोलताना विश्‍वास नांगरे-पाटील म्हणाले, डिजीटल फलकांवर निर्बंध आणण्याची प्राथमिक जबाबदारी नगरपालिका व ग्रामपंचायतींची आहे. त्यांनी परवानगी देताना याचा विचार केला पाहिजे. मात्र तरीही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न म्हणून याबाबत यापुढे पोलिस आपली भुमिका बजावतील. डिजीटल फलक लावणार्‍यांवर सार्वजनिक विद्रुपीकरणाचा गुन्हा दाखल करून फलक बहाद्दरांच्या गुन्हेगारी कृत्यांची नोंद ठेवावी. यापुढे या कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याच्या सुचना पोलीस प्रशासनास देतानाच फलक लावणारांविरोधात पोलिसांच्या व्हॉटसअप ग्रुपवर ग्रामस्थांनी माहिती द्यावी, अशी सुचनाही त्यांनी दिली. 

नांदगावला असणारे औटपोस्ट कालेटेक येथील शासकीय जागेत स्थलांतरीत करावे या मागणीवर लवकरच पोलिस उपअधिक्षक नवनाथ ढवळे पाहणी करून अहवाल पाठवतीले, असे सांगितले.  

मलकापूर शहर पोलीस ठाणे लवकरच सुरू होईल, अशी अपेक्षा विश्‍वास नांगरे-पाटील यांनी व्यक्त केली. याबरोबरच ग्रामसुरक्षा दल सक्षम करून त्यांना अधिकार देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रत्येक गावात महिलांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी दहा महिलांची सुरक्षा समिती तयार करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रिफ्लेक्टर व लाल फडके न लावणार्‍या वाहनांवर गुरूवारपासून गुन्हे दाखल करण्याच्या सुचना त्यांनी केल्या.