Tue, Apr 23, 2019 07:47होमपेज › Satara › खंडणीसाठी महिलेवर वार

खंडणीसाठी महिलेवर वार

Published On: Dec 16 2017 1:49AM | Last Updated: Dec 15 2017 11:40PM

बुकमार्क करा

कराड : प्रतिनिधी

कापड दुकानात खंडणी मागून महिलेवर वार करण्यात आले. त्यानंतर संशयिताने काऊंटरच्या काचा फोडून स्वत:वर ब्लेडने वार करून घेतले. बुधवार पेठेत प्रभात टॉकीजसमोर शुक्रवारी (दि. 15) दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. यानंतर परिसरातील व्यापार्‍यांनी आपली दुकाने बंद ठेवून या घटनेचा निषेध केला. यामुळे कराडात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

विशाल रवींद्र वारे (रा. बुधवार पेठ, कराड) असे खंडणी बहाद्दराचे नाव आहे. तर साजिदा नफीसा खान (रा. मंगळवार पेठ, कराड) असे फिर्यादीचे नाव असून, संशयिताने त्यांच्यावर काचेने वार केला आहे.
येथील बुधवार पेठेतील प्रभात टॉकीजसमोर फिर्यादी साजिदा खान यांचे कापड दुकान आहे. या दुकानात शुक्रवारी दुपारी त्या एकट्याच होत्या. ही संधी साधून संशयित विशाल वारे याने दुकानात प्रवेश करत एक हजाराच्या खंडणीची मागणी केली. तसेच जर्किन द्या, असे म्हणत ते न दिल्यास मी स्वत:ला मारून घेईन आणि तुम्हालाही मारीन, अशी धमकी त्याने दिली. त्यानंतर साजिदा खान यांनी पैसे व जर्किन देण्यास नकार देताच वारे याने स्वत:जवळ असणार्‍या ब्लेडने स्वत:च्या गळ्यावर व हातावर वार केले. त्यानंतर दुकानाच्या काऊंटरची काच फोडून साहित्य अस्ताव्यस्त फेकले. यामुळे दुकानाची सुमारे चार हजाराचे नुकसान झाले असून काचेचा एक तुकडा घेऊन वारे यांने साजीदा खान यांच्या हातावर वार केला. यामध्ये त्या जखमी झाल्या.

जखमी अवस्थेतच साजीदा खान यांनी आरडाओरडा केल्याने शेजारील व परिसरातील व्यापारी मदतीसाठी धावले. त्यांनी हा प्रकार पोलिसांना सांगितल्यानंतर त्यांनी वारेला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. वारे याने स्वतःच्या गळ्यावर ब्लेडने वार करून घेतल्याने रक्‍तस्त्राव होत होता. त्यामुळे त्यास रुग्णालयात नेण्यात आले. तर साजीदा खान यांनाही व्यापार्‍यांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच परिसरातील व्यापार्‍यांनी आपली दुकाने बंद करून संबंधितावर कडक कारवाई करण्याची मागणी करत निषेध नोंदवला. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी प्रसंगावधान राखत परिस्थितीवर नियंत्रण मिळविल्याने काहीकाळानंतर तणाव निवळला. सायंकाळी याप्रकरणी साजीदा खान यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.