Wed, Apr 24, 2019 11:42होमपेज › Satara › प्रशांत पवार यांना अटक

प्रशांत पवार यांना अटक

Published On: Feb 08 2018 1:54AM | Last Updated: Feb 07 2018 11:27PMकराड : प्रतिनिधी 

रेठरे बूद्रूक (ता. कराड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्यातील बहुचर्चित वाहतूक कंत्राटदारांच्या नावावरील बोगस कर्जप्रकरणी कराड शहर पोलिसांनी बुधवार दि. 7 रोजी प्रशांत रंगराव पवार (रा. बेलवडे बुद्रूक) यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी सांगितले.   


4 ऑगस्ट 2016 रोजी यशवंत रामचंद्र पाटील (तांबवे, ता. वाळवा, जि. सांगली) यांनी कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश मोहिते, माजी व्हाईस चेअरमन सुरेश पाटील (रा. येडेमच्छिंद्र, जि. सांगली) यांच्यासह इतर संचालक, बँक ऑफ इंडियाच्या कराड शाखेचे काही अधिकारी यांच्याविरुद्ध कराड शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी अविनाश मोहिते यांच्यासह सुरेश गणपती पाटील, उदयसिंह प्रतापसिंह शिंदे (बोरगाव), वसंत सिताराम पाटील (नेर्ले) आणि महेंद्र ज्ञानू मोहिते (वाटेगाव), अशोक मारूती जगताप (वडगाव हवेली), सर्जेराव रघुनाथ लोकरे (येरवळे), संभाजीराव रामचंद्र जगताप (कोडोली) आणि बाळासाहेब दामोदर निकम (शेरे) यांनाही अटक करण्यात आली होती. कारखान्याचे तत्कालीन कार्यकारी संचालक अशोक नलवडे यांच्यासह कारखान्याच्या दोन कामगारांनाही पोलिसांनी अटक केली होती. 

दरम्यान, याप्रकरणी प्रशांत पवार यांनी जिल्हा न्यायालयात व उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. परंतु, त्यांचा अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जामिनीसाठी अर्ज केला होता. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना काही निर्देश दिले होते. त्यानुसार प्रशांत पवार हे बुधवार दि. 7 रोजी सकाळी कराड येथील न्यायालयात हजर झाले. न्यायालयाने त्यांचा ताबा घेऊन त्यांना न्यायालयीन कोठडी दिली. त्यानंतर त्यांच्या वकीलांनी प्रशांत पवार यांच्या जामिनासाठी न्यायालयाकडे अर्ज दाखल केला. यावेळी सरकारच्या वतीने तसेच प्रशांत पवार यांच्या वतीने असा दोन्ही बाजुच्या वकीलांनी युक्‍तीवाद केला. यावेळी सरकारी वकीलांनी केलेला युक्‍तीवाद ग्राह्य धरून सात दिवसांची पोलिस कोठडी देत प्रशांत पवार यांचा पोलिसांना ताबा दिल्याचेही पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.   यापूर्वी न्यायालयात दाखल केलेल्या कागदपत्रावरून तसेच अटक करण्यात आलेल्या माजी संचालकांच्या चौकशीतून प्रशांत पवार यांचे नाव समोर आल्याचे यापुर्वी पोलिसांनी सांगितले आहे. कंत्राटदारांच्या कागदपत्रांचा गैरवापर करणे, दुसर्‍या व्यक्तीच्या नावावर कर्ज काढून फसवणूक करणे, कट करणे असे आरोप याप्रकरणी करण्यात आले आहेत. त्यातून सुमारे 58 कोटी 63 लाखांचे कर्ज काढण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.