Tue, Aug 20, 2019 04:51होमपेज › Satara › सातारा : एसटीत सापडली ४ बॉक्स विदेशी दारू

सातारा : एसटीत सापडली ४ बॉक्स विदेशी दारू

Published On: Aug 06 2018 8:40PM | Last Updated: Aug 06 2018 8:39PMसातारा : प्रतिनिधी

सातारा एसटी स्टँडमध्ये महाबळेश्‍वर डेपोच्या कंडक्टरने पणजी येथून ६० हजार रुपये किंमतीची ४ बॉक्स दारु सातार्‍यात आणल्यानंतर शहर पोलिसांनी त्याचा पर्दाफाश करुन सर्व मुद्देमाल जप्त केला. सातारा एसटी स्टँडमध्येच ही कारवाई केल्यानंतर परिसरात बघ्यांची अक्षरश: गर्दी उसळली होती. दरम्यान, एसटीद्वारे दारु वाहतुक होत असल्याची अशी कारवाई प्रथमच समोर येत असून या घटनेने खळबळ उडाली आहे.अभिजित बाळकृष्ण शिंदे (वय 30, रा.सुलतानपुर ता.वाई) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी, सोमवारी दुपारी पणजी-महाबळेश्‍वर ही एसटी सातारा बसस्थानकामध्ये आली. यावेळी पोनि नारायण सारंगकर यांना माहिती मिळाली की, संबंधित एसटीमधून दारुची वाहतुक होत आहे. स्टँड चौकीमधील पोलिसांना सोबत घेवून त्या एसटीची झडती घेतली असता टूल बॉक्समध्ये चार दारुचे बॉक्स आढळले. एसटीत एवढ्याप्रमाणात दारु पाहिल्यानंतर पोलिसही अवाक झाले. पोलिसांनी त्यातील बाटल्यांची संख्या मोजली असता त्या एकूण 60 बाटल्या होत्या. या सर्व विदेशी दारुची किंमत तब्बल 60 हजार रुपये असल्याचे समोर आले.

पोलिसांनी घटनास्थळी चालक व कंडक्टरची चौकशी केल्यानंतर ती दारु कंटक्टरने आणली असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करण्यास सुरुवात केल्यानंतर बघ्यांची गर्दी उसळली. पोनि नारायण सारंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार प्रवीण पवार, केतन शिंदे, अरुण दगडे, दत्ता पवार यांनी कारवाईत सहभाग घेतला. रात्री उशीरपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.