होमपेज › Satara › माणचा तलाठी आणि कोतवाल जाळ्यात

माणचा तलाठी आणि कोतवाल जाळ्यात

Published On: Mar 21 2018 10:26PM | Last Updated: Mar 21 2018 10:26PMसातारा : प्रतिनिधी

शेततळ्याची नोंद करुन सातबारा उतारा देण्यासाठी माजी सैनिकाकडून 3 हजार रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी सातारा लाचलुचपत प्रतिबंध विभागाने तलाठी आणि कोतवाल यांना अटक केली. सातारा एसीबीच्या कारवाईने माणमध्ये खळबळ उडाली आहे.

तलाठी रोहित सुधाकर माळी (सध्या रा.वडूज ता.खटाव मूळ रा.पलूस जि.सांगली) व कोतवाल मल्हारी उर्फ भगवान हरिबा वायदंडे (सध्या रा. कुळकजाई ता.माण) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, या प्रकरणातील तक्रारदार हे ज्येष्ठ नागरिक व माजी सैनिक आहेत.   शेततळ्याची नोंद करुन सातबारा घेण्यासाठी ते कुळकजाई ग्रामपंचयातीचे तलाठी रोहित माळी यांना भेटले असता त्यांनी त्या कामासाठी 3 हजार रुपये मागितले.

लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रारदार यांनी सातारा एसीबीच्या विभागात तक्रार दिली. तक्रार दाखल झाल्यानंतर माळी याने लाचेची रक्कम कोतवाल मल्हारी वायदंडे याच्याकडे देण्यास सांगितले. बुधवारी लाचेची रक्कम दहिवडी येथे स्वीकारल्यानंतर एसीबी विभागातील पोलिसांनी रंगेहाथ त्याला पकडले. ही कारवाई झाल्यानंतर पोलिसांनी तलाठी रोहित माळी यालाही ताब्यात घेतले. दहिवडी पोलिस ठाण्यात लाचेसंबंधी गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघा संशयितांना अटक करण्यात आली.

दरम्यान, सातारा शहरासह जिल्ह्यात कुठेही शासकीय कार्यालयात लाचेची मागणी झाल्यास सातारा येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागात किंवा 1064 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे