Mon, Jun 24, 2019 20:58होमपेज › Satara › पंतप्रधानांनी लोकपाल कायदा अधू केला : अण्णा हजारे(व्हिडिओ)

पंतप्रधानांनी लोकपाल कायदा अधू केला : अण्णा हजारे(व्हिडिओ)

Published On: Jan 19 2018 9:22PM | Last Updated: Jan 19 2018 9:22PMकोरेगाव : प्रतिनिधी

प्रगत राष्ट्रांच्या पंगतीत बसत असताना देशभरातील लोकांसाठी अत्यंत गरजेचा असलेला लोकपाल कायदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंजूर केला. मात्र, त्याला अधू बनविण्याचे पाप देखील त्यांनी केले. कायद्याचे तीन दिवसात विधेयक मंजूर केले असून, हे विधेयक कधी आले आणि कधी मंजूर झाले, याचा थांगपत्ताच लागला नाही. असा आरोप ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी केला. 

भारतीय जनसंसद संघटनेच्या प्रसारासाठी अण्णा हजारे यांनी देशव्यापी दौरा सुरु केला आहे. याची पहिलीच सभा शुक्रवारी कोरेगावातील बाजार मैदानावर झाली. त्यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी व्यासपीठावर भारतीय जनसंसद संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अशोक सब्बन, तालुकाध्यक्ष संजय माने, अॅड. अमोल भुतकर, सुरेश येवले, अनिल बोधे, प्रशांत गुरव, रमेश माने, शिवाजीराव गाढवे,  चंद्रकांत कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 

अण्णा हजारे म्‍हणाले, ‘‘माहिती अधिकाराप्रमाणे लोकपाल कायदा हा देशातील जनतेसाठी अत्यंत महत्वाचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकांच्या विश्वासाला तडा देत लोकपाल कायदा बनवला. मात्र, त्याला अधूच केले. तीन दिवसांमध्ये हा कायदा संमत होतो आणि त्याची कोणालाच माहिती होत नाही. याहून मोठे दुर्देव नाही. प्रशासन व सरकारमध्ये पारदर्शकता येण्यासाठी लोकपाल कायदा महत्वाचा आहे. मात्र, मोदी सरकारने आमच्या मसुद्याला बगल देऊन नवीनच कायदा केला तो आम्हाला मान्य नाही. आम्ही दिलेल्या मसुद्याप्रमाणे कायदा करावा, या मागणीसाठी नवी दिल्लीत २३ मार्च पासून पुन्हा आंदोलन छेडणार आहे.’’

 अण्णा हजारे पुढे म्‍हणाले, ‘‘आमच्या संघटनेच्या आधारावर लोकांमध्ये स्थान मिळवून एक मुख्यमंत्री, एक नायब राज्यपाल व केंद्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपद मिळवण्याचे काम काही कार्यकर्त्यांनी केले आहे. आता असे चालणार नाही. भ्रष्ट्राचार विरोधी संघटना बरखास्त केलेली असून, नव्याने भारतीय जनसंसद संघटनेची स्थापना केली आहे. या संघटनेचे चार हजार सभासद बनले असून, दोन लाख सभासद बनविण्याचे उद्दिष्ट आहे.