होमपेज › Satara › सातारा : खटाव तालुक्यासह भागात अतिसाराच्या साथीचे थैमान  

सातारा : खटाव तालुक्यासह भागात अतिसाराच्या साथीचे थैमान  

Published On: Jan 26 2018 5:05PM | Last Updated: Jan 26 2018 5:04PMपुसेसावळी: वार्ताहर

खटाव तालुक्यातील लाडेगाव येथे गेल्या चार दिवसापासून अतिसाराच्या साथीने थैमान घातले असून सध्या तेथे  घबराटीचे वातावरण पसरले आहे.आरोग्य विभागाच्यावतीने आरोग्य सेवा देण्याचे काम तातडीने करण्यात आले आहे. 

आजपर्यंत सुमारे 18 रुग्णांनी आरोग्य उपकेंद्रात उपचार घेतले आहेत.अजूनही काही रुग्ण पुसेसावळी,वडुज व अन्य ठिकाणी खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पाण्याच्या अनियमित शुद्धीकरणामुळे  रोग परिस्थिती उदभवली आहे असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. दरम्यान, निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी एस.आर. टकले व आरोग्य कर्मचारी गेले तीन दिवस लाडेगाव येथे ठाण मांडून आहेत या आरोग्य उपकेंद्रात रुग्ण सेवा घेण्यासाठी दाखल होत आहेत.

 याबाबत माहिती देताना कृष्णत पाटील म्हणाले,गावातील दूषित पाणीपुरवठ्यामुळे साथरोग उदभवली आहे.वैद्यकीय सेवा चांगल्या पद्धतीने मिळत आहे. दरम्यान,लाडेगावचे सरपंच संतोष कदम यांचेशी संपर्क साधला असता ते म्हणाले,गावाला पाणी पुरवठा नेहमी शुद्ध व स्वच्छ असतो. उदभवलेल्या साथरोगाला आळा घालण्यासाठी तातडीने गावची पाणी पुरवठा विहीर व सार्वजनिक ठिकाणाचे पाण्याचे स्रोत यांची साफसफाई करून ग्रामस्थांना दिलासा देत आहोत. रुग्णांना आरोग्यसेवाही चांगल्या पद्धतीने मिळत आहे.

सध्या परिस्थिती आटोक्यात आली आहे.नागरिकांनी घाबरून न जाता पाणी उकळून गार करून प्यावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.21 जानेवारीपासून जलसुरक्षकांशी समन्वय साधून पाण्याचे नमुने तपासून योग्य ती उपाययोजना केली जात आहे.

आतापर्यंत सुधीर मारुती यादव (वय 35), संदीप सदाशिव  यादव (वय 28), सुमन बाळासो राऊत ( वय50 ),वैशाली विठ्ठल दबडे (वय 32),पायल प्रकाश दबडे( वय23),विठ्ठल भीमराव दबडे(वय 40),शुभम प्रकाश दबडे ( वय20), मारुती रामचंद्र गायकवाड(वय32),अशोक वसंत गायकवाड(वय42), गंगाराम शंकर मदने( वय40), कमल मारुती घार्गे ( वय50), लिलाबाई शिवाजी घाडगे( वय65), पूजा रमेश उमापे( वय25), सुरज राजेंद्र गुरव( वय27),नितीन रामचंद्र गुरव( वय21),प्राजक्ता आबाजी  यादव( वय15),गजराबाई गोपाळ थोरात(वय60),कृष्णा बाबूराव यादव( वय50)अशी उपचार घेतलेल्या रुग्णांची नावे आहेत.यातील 10 रुग्ण आज पुन्हा उपचार घेण्यासाठी दाखल झाले आहेत.