Tue, Apr 23, 2019 23:55होमपेज › Satara › रुग्णवाहिकेविना परळी खोर्‍यात हेळसांड

रुग्णवाहिकेविना परळी खोर्‍यात हेळसांड

Published On: Dec 16 2017 1:49AM | Last Updated: Dec 15 2017 11:15PM

बुकमार्क करा

परळी : वार्ताहर

सर्वसामान्य रूग्णांना तात्काळ प्राथमिक आरोग्य सेवा देण्याच्या दृष्टीने 108 नंबर डायल केल्यास रूग्णवाहिका उपलब्ध होते. मात्र, परळी खोर्‍यासाठी ही रूग्णवाहिका ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी झाली आहे. गरज असल्यास टोल फ्री क्रमांकावरून संपर्क साधल्यास रूग्णवाहिकाच उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे या सेवेचा दुर्गम भागात असणार्‍या नागरिकांना फायदा होताना दिसत नाही. 

प्रसुती, अपघात, सर्पदंश अशावेळी तत्काळ प्राथमिक उपचार तसेच अत्यावश्यक उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी टोल फ्री 108 या क्रमांकावर कॉल केल्यास रूग्णवाहिका उपलब्ध व्हावे अशी व्यवस्था शासनाने केली आहे. हे वाहन प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

परळी प्राथमिक आरोग्य केंद्रातही 108 चे वाहन उपलब्ध आहे. परंतु, या वाहनाला दुर्गम वाड्या-वस्त्यांचे वावगे असल्यासारखे आहे. ज्या लोकांना डोंगरदर्‍यावर वाहने उपलब्ध नसतात. अशा नागरिकांसाठी हे वाहन म्हणजे एक प्रकारे वरदानच. मात्र, परळी खोर्‍यातील काही गावांमधून 108 या टोलफ्री क्रमांकावरुन रुग्णवाहिकाला कॉल केल्यावर गावची माहिती सांगितल्यावर सध्या वाहन उपलब्ध नाही असेच उत्तर मिळते. याचा प्रत्यय नागरिकांना येत आहे. 

पळसावडे येथील धोंडीबा  जानकर  यांना गेल्या आठवड्यात सर्पदंश झाला होता. यावेळी नातेवाईकांनी 108 ला कॉल करुनही वाहन उपलब्ध झाले नाही. तसेच पूजा ताटे यांना प्रसुतीसाठी रुग्णालयात न्यायचे होते. त्यावेळीही 108 नंबरवर संपर्क साधला असता वाहन उपलब्ध झाले नाही. बोंडारवाडी, पळसावडे, मोरेवाडी, पवनगाव, सांडवली, घाटवन, तांबी अशा डोंगरमाथ्यावरील गावामधून अत्यावश्यक सेवेसाठी रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही. ज्या लोकांना रुग्णांना या सेवेची गरज आहे अशा लोकांसाठी हे वाहन उपलब्ध होत नाही.