Mon, May 27, 2019 06:41होमपेज › Satara › अंबेनळी घाट अपघात : असा होता मदतकार्याचा थरार...

अंबेनळी घाट अपघात : असा होता मदतकार्याचा थरार...

Published On: Jul 30 2018 1:32AM | Last Updated: Jul 29 2018 11:32PMमहाबळेश्‍वर : प्रेषीत गांधी 

महाबळेश्‍वर-पोलादपूरदरम्यानच्या अंबेनळी घाटात शनिवारी सकाळी अक्षरश: मृत्यूचे तांडवनृत्य झाले. दापोली येथील कोकण कृषि विद्यापीठाच्या कर्मचार्‍यांच्या बसला झालेल्या भीषण अपघातानंतर ओढवलेली भयावह स्थिती अद्यापही कायम आहे. शनिवारी दुपारपासून रविवारी सकाळपर्यंत एनडीआरएफच्या जवानांसह विविध ट्रेकर्स व गिर्यारोहकांनी खडतर प्रयत्न करून 30 जणांचे मृतदेह दरीतून बाहेर काढले. हे मदतकार्य आश्‍चर्यकारक असून हा थरार थक्‍क करणारा होता. 

‘ऍम्ब्युलन्स’ची फौज... 

दाभीळ टोक येथे झालेल्या अपघातामध्ये 30 जणांचा मृत्यू झाला. यावेळी मदत कार्यात विविध सामाजिक संस्थांसह ऍम्ब्युलन्स, डॉक्टर्स, नर्स ची फौज घटनास्थळी पाहावयास मिळत होती. गेले 24  तासांहून अधिक काळ चालू असलेल्या या कामात सातारा, कोकण विभागातील शेकडो ऍम्ब्युलन्स घटनास्थळी तळ ठोकून होत्या. 

‘कोळी’ काकू       

महाबळेश्‍वर पोलिस ठाण्याच्या बाजूला मनुक्याचे छोटेसे दुकान असलेल्या ‘कोळी काकू’ कोणतीही, कधी ही, कोठेही घटना घडू दे कळताच त्या त्या ठिकाणी पोहचतात. शनिवारी देखील घटना घडताच ट्रेेकर्सच्या सदस्यांना मदतीसोबतच नाष्टा व जेवण पोहचविण्याची व्यवस्था याच ‘कोळी काकूं’नी चोख पार पाडली.

बिस्कीट व पाणीच आधार... 

शनिवारी सकाळी झालेल्या या अपघातात सह्याद्री व महाबळेश्‍वर ट्रेेकर्सच्या जवानांसह काही संस्था 600 फूटांवरखाली उतरले होते. सकाळी 12 वाजता सुरु झालेले हे कार्य सायंकाळी 7 च्या सुमाराला अंधार पडल्याने ट्रेेकर्सच्या जवानांनी थांबविले. मात्र दिवसभर खाली असलेल्या जवानांनी एकूण 14  मृतदेह बाहेर काढले. मदतकार्या दरम्यान,  जवानांनी बिस्कीट व पाण्याचा आधार घेतला.

खोल दरीत 600 फुटांवर काम करणारे म’श्‍वरचे जवान 

सह्याद्री ट्रेकर्सचे संजय पारठे, नगरसेवक कुमार शिंदे, किरण चव्हाण, अमित कोळी, सुनिल जाधव, अक्षय शेलार व सहकारी. महाबळेश्वर ट्रेकर्सचे - निलेश बावळेकर, सनी बावळेकर, अनिल केळगणे, सुनील भाटिया, जयवंत बिरामणे, जयवंत जांभळे, प्रवीण देशमुख, ओंकार नविलकर, अक्षय माने आदिंसह सहकार्‍यांनी 600 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढले.

संरक्षक कठडे व रिप्लेकटरची आवश्यकता

महाबळेश्‍वर येथील प्रतापगड-पोलादपूर घाट, केळघर घाट व आंबेनळी घाटातील रस्त्यांना संरक्षक कठडे व रिप्लेक्टर नसल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे. या मार्गावर अनेक वेळा अपघात झाले आहेत. संबंधीत विभागाकडे याबाबत वेळोवेळी सामाजिक संघटनांनी पाठपुरावा करून देखील प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे. मात्र या भिषण अपघातानंतर तरी प्रशासनाने बोध घेवून संरक्षक कठडे व रिप्लेकटर बसवावेत, अशी मागणी प्रवाशी वर्गातून होत आहे.

मदत करणार्‍याने स्वत:चा मोबाईलच दिला

पोलादपूर (अंबेनळी ) घाटात शनिवारी सकाळी  11 वाजता अपघात झाल्यानंतर यातील बचावलेले एकमेव प्रकाश सावंत-देसाई हे रस्त्यावर आल्यानंतर मदतीसाठी येणार्‍या जाणार्‍या प्रत्येक वाहनाला थांबवण्याचा प्रयत्न करत होते. दुर्देवाने मात्र सुरुवातीला काही वाहने थांबली नाहीत. एका वाहन चालकाला दया आल्यानंतर तो थांबला असता देसाई यांनी अपघाताची माहिती दिली व स्वत:चा मोबाईल हरवला असल्याचे सांगून त्या चालकाला मोबाईल देण्याची विनंती केली.

त्या चालकाने घटनेबाबत माहिती विचारल्यानंतर सुमारे तीस जणांची बस दरीत कोसळ्याचे सांगितले. यावेळी चालकानेही दरीत पाहिले असता त्याला अपघात झाला असल्याचे स्पष्ट दिसले. देसाई यांनी दिलेली माहिती व पाहिलेला अपघात यामुळे त्या चालकालाही दरदरुन घाम फुटला. त्यावर त्याने लगेच स्वत:चा मोबाईल काढून देसाई यांना दिला. एक कॉल झाल्यानंतर देसाई यांनी तो मोबाईल त्या चालकाला परत दिला. मात्र चालकाला घटनेची व्याप्‍ती लक्षात आल्यानंतर तो मोबाईल त्यांनाच ठेवण्यास सांगितले. या अपघातात जास्तीत जास्त लोक ठार झाले असल्याचे त्या चालकाला जाणवल्याने तो ही जास्तवेळ न थांबता तेथून देसाई यांनाच मोबाईल देवून निघून गेला. 

‘ट्रेकर्स’ना दुखापती

सुमारे 600 फूट खोल दरीमध्ये मृतदेह काढण्यासाठी उतरलेल्या सहयाद्री व महाबळेश्‍वर ट्रेकर्सच्या काही जवानांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत.  मात्र उपलब्ध असलेल्या वैद्यकीय सुविधांच्या मदतीने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.

‘जेवण’ व ‘चहा’ ची सोय...  

रात्री व रविवारी पहाटेपासून अव्याहतपणे सुरु असलेल्या अशा या दुर्दैवी प्रसंगात सर्व मदत कार्यात जैन समाज संघ दापोलीच्या सभासदांनी शनिवारी रात्री पासून या मदतकार्यात सहभागी असलेल्याना वडापाव चहा तसेच जेवणाची सोया केली होती. आपुलकीने ही संघटना ट्रेेकर्सचे जवान, सेवाभावी संस्थांचे कार्यकर्ते,पोलीस प्रशासनास जेवणाचे वाटप करत होते.