Thu, Jan 24, 2019 04:40होमपेज › Satara › कटु प्रसंगाची कशाला हवी ‘आठवण’?

कटु प्रसंगाची कशाला हवी ‘आठवण’?

Published On: Aug 29 2018 1:44AM | Last Updated: Aug 28 2018 8:24PMमहाबळेश्‍वर : प्रेषित गांधी

महाबळेश्‍वर-पोलादपूर मुख्य रस्त्यावरील अंबेनळी घाटात कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचार्‍यांची बस कोसळून झालेल्या अपघातात 30 जणांचा जागीच मृत्यू झाला होता. या अपघाताला आता एक महिना पूर्ण झाला आहे. या ठिकाणाला ‘आठवण पॉईंट’ असे नामकरण करण्यात आले आहे. मात्र, अशा दुर्दैवी घटनेच्या ठिकाणाचे ‘आठवण पॉईंट’ म्हणून नामकरण करणे कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.

जुलै महिन्याच्या शनिवारी  रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील कर्मचार्‍यांची खासगी बस 31 कर्मचारी घेवून महाबळेश्‍वर सहलीला निघाली होती. शनिवारी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास अंबेनळी घाटातील दाभिळ गावाच्या हद्दीत 600 फुट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात कोकण कृषी विद्यापीठाचे सहा अधीक्षक प्रकाश सावंत देसाई हे आश्‍चर्यकारक बचावले. बसमधील दोन चालकांसह 30 जण या अपघातात जागीच ठार झाले. या घटनेला एक महिना पूर्ण होत असून अपघात कसा झाला?, नक्की बस कोण चालवीत होतं? आदी प्रश्‍न अनुत्तरीत आहेत. त्यातच गेल्या काही दिवसांपूर्वी काहींनी या अपघातस्थळाला ‘आठवण पॉईंट’ असे नाव देवून फलक लावला आहे.

या फलकावर काळाने घाला घातलेल्या 30 जणांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. तसेच  शोकाकुल म्हणून आई-बाबा, पत्नी, मुले, बंधू-भगिनी अशा आशयाचा मजकूर आहे. या अपघातस्थळाचे नवे नामकरणच करण्यात आले आहे. मात्र, अशा दुर्दैवी घटनेच्या आठवण पुसल्या जाव्यात यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असतानाच नामकरण करुन त्याच त्या आठवणींना ताज्या ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या मार्गावरुन ये-जा करणार्‍या पर्यटकांमध्ये फलकामुळे कायम भीतीचे वातावरण राहणार आहे. याचा परिणाम महाबळेश्‍वर, पाचगणी येथील पर्यटनावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.