होमपेज › Satara › अजिंक्यतार्‍यावरून पडलेल्या तिघांना बाहेर काढण्यात यश 

अजिंक्यतार्‍यावरून पडलेल्या तिघांना बाहेर काढण्यात यश 

Published On: Feb 19 2018 1:33PM | Last Updated: Feb 19 2018 1:33PMसातारा : प्रतिनिधी 

अजिंक्यतारा किल्ल्यावरून शनिवारी सायंकाळी दरीत कोसळलेल्या एका व्यक्तीसह त्याला वाचविण्यासाठी गेलेले दोन पोलिस जवान दरीतच अडकून पडले होते. त्यांना रविवारी पहाटे दरीतून बाहेर काढण्यात महाबळेश्वर ट्रेकर्सच्या कार्यकर्त्यांना यश आले. या कामगिरीची सर्वत्र कौतुक होत आहे.

याबाबतची माहिती अशी, शनिवारी सायंकाळी कोडोली येथील संभाजी जाधव हा अजिंक्यतार्‍यावर फिरण्यासाठी गेला होता. अजिंक्यतार्‍याच्या पाठीमागील दरीत पाय घसरून तो खाली पडला. शुध्दीवर आल्यानंतर त्याने ओरडायला सुरवात केली मात्र, त्या भागात कोणीही आले नाही. सोमवारी शिवजयंतीसाठी अजिंक्यतारा किल्ल्यावरून शिवज्योत आणणार्‍या युवकांची सध्या वर्दळ सुरु आहे. रविवारी रात्री काही युवक गडावर असताना त्यांनी आवाज ऐकून पोलिसांना माहिती दिली. दोन पोलिस जवान शोध घेत जखमी युवकापर्यंत पोहचले परंतू त्यांनाही खाली उतरता येत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी महाबळेश्वर ट्रेकर्सच्या कार्यकर्त्यांना बोलावले. महाबळेश्वर ट्रेकर्सचे कार्यकर्ते पहाटे अजिंक्यतार्‍यावर पोहचले आणि त्यांनी जखमी संभाजीसह दोन पोलिस कर्मचार्‍यांनाही दरीतून सुखरूप बाहेर काढले.

या मोहिमेत महाबळेश्वर ट्रेकर्सचे कार्यकर्ते अनिल केळगणे, संजय पार्टे, सुनीलबाबा भाटिया, सनी बावळेकर, निलेश बावळेकर, प्रवीण जाधव, दुर्वास पाटसुते यांनी परिश्रम घेतले. महाबळेश्वर ट्रेकर्सच्या युवक मावळ्यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.