Tue, Jul 16, 2019 13:37होमपेज › Satara › मराठीच्या अभिजातसाठी दिल्लीत धरणे 

मराठीच्या अभिजातसाठी दिल्लीत धरणे 

Published On: Dec 14 2017 1:46AM | Last Updated: Dec 13 2017 11:14PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंबंधीच्या प्रस्तावाबाबतचे सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण झाले आहेत.  केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने सुधारित कॅबिनेट नोट तयार करण्याची प्रक्रिया सुरू कळवले होते. मात्र, त्यावर अद्यापही कोणतीच कार्यवाही झालेली नाही. यासाठी फेब्रुवारी 2018 पर्यंत ठोस आश्‍वासन द्यावे, या मागणीसाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्यावतीने दिल्‍लीत धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा मसापचे जिल्हा प्रतिनिधी विनोद कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिला. 

कुलकर्णी म्हणाले, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी राज्य शासन व विविध मान्यवरांना पत्रव्यवहार केला होता. याबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवून दोन वर्षे झाल्यानंतरही कोणतीच कार्यवाही झालेली नव्हती. त्यानंतर भिलार येथे मुख्यमंत्री ना. फडणवीस यांची भेट घेतली असता त्यांनी याबाबत व्यक्‍तिश: पाठपुरवा करू असे आश्‍वासन दिले होते.  त्यानंतर पुन्हा पत्रव्यवहार केला असता टोलवा टोलवी करण्यात येत आहे.

येत्या मराठी भाषा दिनापूर्वी म्हणजे 27 फेब्रुवारी 2018 पूर्वी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत पंतप्रधानांनी ठोस आश्वासन द्यावे. यासाठी पंतप्रधानांचे या प्रश्‍नाकडे लक्ष वेधण्यासाठी दि. 26 रोजी कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी,  जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकिहाळ यांच्या नेतृत्वाखाली नामवंत साहित्यिक, समाजसेवक, मान्यवरांना घेऊन पंतप्रधान कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी केंद्रातील मंत्री, विविध पक्षाचे नेते व ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी  आंदोलनाला पाठिंबा देऊन सहभागी व्हावे अशी विनंती केली आहे. यावेळी किशोर बेडकिहाळ, कार्याध्यक्ष नंदकुमार सावंत,  कार्यवाह अ‍ॅड. चंद्रकांत बेबले, कार्यवाह डॉ. उमेश करंबळेकर उपस्थित होते.