Wed, Apr 24, 2019 16:12होमपेज › Satara › जिल्ह्यातील १३ दूध डेअर्‍यांमध्ये भेसळ

जिल्ह्यातील १३ दूध डेअर्‍यांमध्ये भेसळ

Published On: May 24 2018 1:33AM | Last Updated: May 23 2018 11:09PMसातारा : प्रतिनिधी

जिल्ह्यात दूधभेसळीत पूर्वेकडील काही तालुके आघाडीवर आहेत. अन्‍न व औषध प्रशासनाने यावर्षी दूध डेअर्‍यांच्या दुधाचे नमुने तपासण्यासाठी हाती घेतलेल्या मोहिमेत 13 डेअर्‍यांचे नमुने कमी दर्जाचे आले आहेत. या दुधात भेसळ असल्याचा अहवाल अन्‍न विभागानेे तयार केला आहे. याप्रकरणी लवकरच पुढील कारवाई करण्याचा इशारा अन्‍न व औषध प्रशासनाने दिला आहे. 

बर्‍याच प्रकरणात दूधभेसळ ओळखता येत नसल्यामुळेच संबंधितांचे फावले आहे. प्रामुख्याने दुधात पाणी मिसळण्याची प्रक्रिया बेमालूमपणे पार पाडली जाते. दुधात वापरल्या जाणार्‍या या भेसळयुक्‍त पाण्याचे प्रमाण लॅक्टोमीटरनेही पडताळून पाहता येते. परंतु, तशी तसदी घेतली जात नसल्यामुळे अगदी घरगुती रतीबाच्या दुधातही भेसळ होताना दिसते.

सातारा, कराड, फलटण, कोरेगाव, वाई, खंडाळा, दहिवडी, वडूज, पाटण, महाबळेश्‍वर, पाचगणी, रहिमतपूर, उंब्रज, मेढा, लोणंद, शिरवळ अशा शहरी व निमशहरी भागात प्रामुख्याने झोपडपट्टी परिसरात पहाटेच्या मोठ्या प्रमाणावर दूधभेसळ केली जाते.  अनेक मान्यताप्राप्त कंपन्यांच्या किंवा दूध संघांच्या दुधाच्या पिशव्यांमध्ये पाणी भरले जाते. अशा अनेक टोळ्या निर्माण झाल्या असून  कडक कायदा नसल्यामुळे भेसळखोरीचे प्रस्थ माजले आहे. दूध डेअर्‍या तसेच कुलिंग यंत्रणांच्या माध्यमातूनही वेगवेगळ्या प्रकारची भेसळ दुधात केली जाते. अशा दूध भेसळखोरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अन्न व औषध विभागाने जिल्ह्यात मोठी मोहीम हाती घेतली. त्यामध्ये 13 दूध डेअर्‍यांच्या दुधाचे नमुने कमी दर्जाचे आले आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याचे प्रस्तावित आहे.

त्यामध्ये मे. श्रीराम दूध संकलन केंद्र  बिजवडी (ता. माण), मे. श्रीराज दूध संकलन केंद्र चोराडे (ता. खटाव),  मे. सिध्दकला मिल्क अ‍ॅण्ड मिल्क प्रॉडक्ट्स धामणेर (ता. कोरेगाव), मे. पृथ्वीराज रियल क्‍वॉलिटी मिल्क अ‍ॅण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि. बनपुरी (ता. खटाव), मे. जे. के. मिल्कस् जुनी एमआयडीसी कोडोली (सातारा), मे. वांगणा दूध संकलन व शीतकरण केंद्र हिवरे (ता. कोरेगाव),  मे. संकल्प डेअरी धुळदेव (ता. माण), मे. साई दूध संकलन अ‍ॅण्ड शीतकरण केंद्र, नायगाव (ता. कोरेगाव), मे. तानाजी शंकरराव गाढवे धर्मपुरी (ता वाई), मे. जय मिल्क अ‍ॅण्ड मिल्क प्रॉडक्ट्स धारपुडी (ता. खटाव), मे. कृष्णराज डेयरी अ‍ॅण्ड डेअरी प्रॉडक्ट्स फडतरवाडी (ता. फलटण), मे. सोनाई चिलिंग सेंटर मोही (ता. माण), मे. पश्‍चिम महाराष्ट्र मिल्क फूड प्रॉडक्ट्स चिमणगाव (ता. कोरेगाव) अशा दूध संकलन केंद्रांचा समावेश असल्याची माहिती अन्‍न औषध प्रशासन विभागाकडून देण्यात आली. 

भेसळखोरांना ‘मोक्‍का’ कायदा लावतानाच जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्याबाबत अन्न व भेसळ प्रतिबंधक कायद्यात दुरुस्ती करण्याचे प्रस्तावित आहे. परंतु, प्रत्यक्षात त्याप्रमाणे कार्यवाही झालेली नाही.  त्यामुळे दूध भेसळखोरांना अटक झाली तरी काही दिवसांनंतर जामीनावर त्यांची मुक्‍तता होते. अन्न व औषध प्रशासनाकडे अशा भेसळखोरांवर नियंत्रण ठेवणे आव्हानाचे झाले आहे.  तरीही सातत्याने होत असलेल्या कारवायांमुळे दूध भेसळीवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पण  कारवाईत आणखी गती वाढवण्याची मागणी होत आहे.

दूध वितरण व्यवस्थेतून भेसळ

जिल्ह्यातील कराड, फलटण, माण, कोरेगाव या तालुक्यांतील काही दूध संकलन केंद्रांवर प्रचंड प्रमाणात भेसळ होत असल्याची चर्चा ग्रामीण भागात सुरू आहे. त्यादृष्टीने अन्‍न व औषध विभागाने कारवाई करावी. त्या ठिकाणी अचानक छापे टाकून टँकर्सचीही  तपासणी करावी. संबंधित टँकरमधील दूध कुठून आणले आणि कोठे नेले जाणार होते, याची माहिती घेतल्यास दुधात भेसळ करणारे मोठे रॅकेट सापडेल. पण, त्यासाठी अन्‍न औषध प्रशासनाने अन्‍नसुरक्षा अधिकार्‍यांना घेऊन  ग्राऊंडवर उतरून कारवाई केली पाहिजे, अशी मागणी होत आहे.