Sat, Apr 20, 2019 08:48होमपेज › Satara › मोका, तडीपारीचा तडाखा सुरूच ठेवणार; पंकज देशमुख (व्हिडिओ)

मोका, तडीपारीचा तडाखा सुरूच ठेवणार; पंकज देशमुख (व्हिडिओ)

Published On: Aug 01 2018 6:29PM | Last Updated: Aug 01 2018 11:01PMसातारा : प्रतिनिधी

सातार्‍याची गुन्हेगारी समूळ नष्ट करण्याचे जे प्रयत्न तत्कालीन पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी केले तेच काम आपण पुढे नेणार आहे. राजकीयसह कोणत्याही शक्‍तीचा आपण दबाव घेणार नसून मोका, तडीपारीच्या कारवायांचा तडाखा सुरूच  ठेवणार आहोत, अशा शब्दांत सातारचे नूतन पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी आपले इरादे स्पष्ट केले.दरम्यान, नामचिन गुंडांवर दाखल असलेल्या मोका गुन्ह्यांचा कसून तपास करून ते ‘लॉजिकल एंड’पर्यंत नेणार असल्याचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ही त्यांनी स्पष्ट केला.

नूतन पोलिस अधीक्षक पंकज देशमुख बुधवारी दुपारी दोन वाजता उस्मानाबाद येथून सातार्‍यात दाखल झाले. आल्याआल्याच त्यांनी पहिल्याच पत्रकार परिषदेत गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करणार असल्याचे सांगितले.     

ते म्हणाले, सातारा पोलिस दलाचे एसपी संदीप पाटील यांनी ज्याप्रमाणे काम केले आहे तेच काम आपणाला पुढे न्यायचे आहे. पोलिस दलातील जे लोक गुन्हेगारांना मदत करतात त्यांच्यावर कडक कारवाई होईल. कोणताही राजकीय दबाव आपण घेणार नाही. गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन केले जाईल. आतापर्यंत मोक्‍का व तडीपारीच्या ज्या कारवाया झाल्या आहेत त्याच पध्दतीने उर्वरीत राहिलेल्या कारवाया केल्या जातील.

नामचिन गुंडांची जी पिलावळ राहिलेली आहे त्यांच्यावर आपल्या कालावधीत नक्‍की कारवाई केली जाईल. दाखल असलेल्या विविध मोक्‍का गुन्ह्यांचा तपास हे आपल्यासमोरील आव्हान राहणार आहे. मोक्‍काचा तपास योग्य पध्दतीने करुन त्याचा शेवट ‘निकालात’ कसा लागेल हा आपला प्रामाणिक प्रयत्न राहणार असल्याचेही एसपी पंकज देशमुख यांनी स्पष्ट केले.

सातारा पोलिस वसाहतीच्या प्रश्‍नाची आपण माहिती घेतली असल्याचे सांगून ते म्हणाले,  पोलिस वसाहतीचे  तांत्रिक सोपस्कार जवळपास सर्व झालेले आहेत. टेंडर प्रक्रियाही अंतिम टप्प्प्यात असून इतर माहिती घेवून पोलिस वसाहतीचा प्रश्‍न निकालीत निघण्यासाठीही निश्‍चित प्रयत्न केले जातील. तत्कालिन पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी पोलिस पाल्यांच्या मुलांसाठी सुरु केलेली शाळा कौतुकास्पद असून आपण या शाळेच्या पुढील प्रक्रियाही पार पाडणर असून त्याच्या इमारतीचा प्रश्‍नही निकाली काढणार आहेे.

सातार्‍यातील विविध प्रश्‍नांपैकी वाहतुकीचा प्रश्‍न कळीचा असल्याचे सांगताचे एसपी पंकज देशमुख म्हणाले, पोलिस दलातील आपल्य अधिकार्‍यांशी बोलून वाहतूक व रिक्षा चालकांबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल. दरम्यान, तत्कालीन पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांची बदली झाल्यानंतर सातारकर ती बदली रद्द करण्यासाठी रस्त्यावर उतरल्याने आपणाला सातारकरांचा व पोलिस दलाचा अभिमान असल्याची भावना त्यांनी व्यक्‍त केली.

सध्या मराठा आंदोलन सुरु असल्याने यावेळी जिल्ह्यातील मराठा आंदोलन मोर्चाचीही त्यांनी माहिती घेतली. तसेच प्रसिध्दी माध्यमांशी आपण व पोलिस दलाच्यावतीने संवाद राखला जाईल. दाखल गुन्ह्यांची माहिती, पोलिसांच्या कारवाईची माहिती दिली जाईल असे सांगून  सातारची पत्रकारिता प्रगल्भ असल्याचेही ते म्हणाले.यावेळी अप्पर पोलिस अधिक्षक विजय पवार, पोलिस उपअधीक्षक गजानन राजमाने, राजलक्ष्मी शिवणकर, एलसीबीचे पोनि पद्माकर घनवट उपस्थित होते.

एसपी वर्धा जिल्ह्यातील बी.ई. सॉफ्टवेअर..

सातारा जिल्हा पोलिस दलाचा चार्ज घेतल्यानंतर पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी स्वत:ची ओळख करून दिली. ते मूळचे हिंगणघाट, जि. वर्धा येथील असून ते बी.ई. आयटी आहेत. शिक्षण झाल्यानंतर पुणे येथे त्यांनी खासगी कंपनीमध्ये काम केले आहे. यादरम्यान केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अभ्यास सुरू असताना त्यांना यश मिळाले. 2011 सालच्या बॅचचे ते आयपीएस आहेत. हैद्राबाद येथे ट्रेनिंग झाल्यानंतर सुरुवातीला प्रोबेशनरीवर अमरावती ते येथे होते. त्यानंतर नांदेड व अहमदनगर येथे अतिरिक्‍त जिल्हा पोलिस अधीक्षकपदाची जबाबदारी पार पाडल्यानंतर उस्मानाबाद येथे पोलिस अधीक्षक म्हणून त्यांना पहिले पोस्टिंग मिळाले असून सातारा ही त्यांची दुसरी पोस्टिंग आहे.