Sat, Jul 20, 2019 22:05होमपेज › Satara › पित्याच्या ट्रॅक्टरखालीच गेला चिमुरड्याचा जीव

पित्याच्या ट्रॅक्टरखालीच गेला चिमुरड्याचा जीव

Published On: Jan 17 2018 7:08PM | Last Updated: Jan 17 2018 7:19PM

बुकमार्क करा
विडणी : वार्ताहर

वडील ट्रॅक्टर मागे घेत असतानाच मागून रांगत आलेला अवघ्या 13 महिन्यांचा मुलगा वडिलांना न दिसल्याने मागील चाकाखाली चिरडून जागीच ठार झाला. ही हृदयद्रावक घटना विडणी (ता. फलटण) येथे बुधवारी सकाळी 11 वाजता घडली असून गावात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेने वडिलांनाही जबर मानसिक धक्का बसला आहे.

बुधवारी (दि. 17) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास विडणी (नाना अभंगवस्ती) नजीक असलेल्या फुले वस्ती येथील नागेश फुले हे आपला ट्रॅक्टर घेऊन घरातून शेताकडे निघाले होते. ते ट्रॅक्टर रिव्हर्स घेत होते. यावेळी त्यांचा अवघ्या 13 महिन्यांचा मुलगा अवधूत फुले हा घरातून अचानक बाहेर ट्रॅक्टरच्या मागील दिशेने रांगत आला. वडिलांना याची कल्पना नसल्याने राहत्या घरासमोरच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

गेल्याच महिन्यात झाला होता अवधूतचा वाढदिवस

गेल्याच महिन्यात अवधूतचा पहिला वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला होता. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण फुले कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वडिलांनाही मानसिक धक्का बसला असून या घटनेमुळे संपूर्ण विडणी व परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. याबाबतची फिर्याद मुलाचे वडील नागेश फुले यांनी स्वत:च फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.