लोणंद : प्रतिनिधी
लोणंद-निरा रस्त्यावरील पाडेगाव गावचे हद्दीत जीप कॅनॉलमध्ये पडून ३ ठार तर, ६ जण जखमी झाले आहेत. महेश जगन्नाथ बल्लाळ (वय 26), दादा गोरख बल्लाळ (वय 4 , दोघे रा. बल्लाळवाडी) आणि सृष्टी संतोष साळुंखे (वय 9 रा. दावलेवाडी) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. जखमींना लोणंद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वावरहिरे (ता.माण) येथून मुंबईला निघालेली जीप रविवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास चालकाचा ताबा सुटल्याने कॅनॉलमधील वाहत्या पाण्यात पडली. या अपघातात चालकासह दोघे जण जागीच ठार झाले.
माण तालुक्यातील वावरहिरे येथील साळुंखे आणि बल्लाळ हे दोन कुटुंबीय भाग्यश्री टुर्स अॅन्ड ट्रॅव्हर्लसच्या जीप (क्र. MH 42 AQ 574) मधुन मुंबईला निघाले होते. त्यांनी लोणंदच्या पुढे एका ढाब्यावर जेवण केले, यावेळी चालक महेश बल्लाळ हा दारु पिला. पाडेगाव जवळील कॅनॉलच्या वळणावर त्याचा गाडीवरील ताबा सुटल्याने जीप कॅनालध्ये गेली. पाण्याच्या वेगाने जीप पाण्यातच एका बाजुला उभी राहीली. या अपघाताचा आवाज ऐकल्यानंर कॅनॉल जवळील पाडेगाव येथील नवले कुंटुबातील युवकांनी घटनास्थळी धाव घेतली. याच दरम्यान एका आरोपीच्या शोधात असलेले लोणंद पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे व त्यांच्या सहकाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थ निखिल नवले, रोहीत नवले, कॉ. अविनाश शिंदे, कॉ. रोहीत गायकवाड यांनी पाण्यात उडया मारून जीप मध्ये अडकलेल्या प्रवाशांना दोरीच्या सहाय्याने बाहेर काढले आणि त्यांना लोणंद येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले.