Wed, Apr 24, 2019 19:50होमपेज › Satara › बसखाली चिरडून माय-लेकींचा अंत

बसखाली चिरडून माय-लेकींचा अंत

Published On: Aug 05 2018 7:30PM | Last Updated: Aug 05 2018 7:30PMमेढा/कुडाळ : प्रतिनिधी

मेढा येथील मुख्य बाजार चौकामध्ये रविवारी सायंकाळी 5 च्या सुमारास सातारा-मेढा या बसच्या चाकाखाली  चिरडून  माय-लेकीचा  मृत्यू झाला.  हा प्रकार झाल्यानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली. माय लेकींचा असा करूण अंत पाहून उपस्थितांचीही मने हेलावून गेली होती.  दरम्यान, ज्या बसने सातार्‍यातून मेढ्यापर्यंत प्रवास केला तीच बस या माय-लेकींसाठी काळ बनून आली. 

शालिनी रमेश चव्हाण (वय 22, रा. जवळवाडी, मेढा) व अंजली रमेश चव्हाण (वय 4) अशी या दुर्दैवी माय लेकींची नावे आहेत. दरम्यान, याप्रकरणी एस. टी. चालक दादा उत्तम जाधव (वय 39, रा. सासपडे, ता. सातारा) याच्यावर मेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत मिळालेली  माहिती अशी, शालिनी ही पतीसमवेत सातार्‍याला काही कामानिमित्त आल्या होत्या. काम झाल्यानंतर त्या सातार्‍याहून मेढ्यात बसमधून (क्रमांक एम. एच. 40 एन. 9437) आल्या. सायंकाळी 5 च्या सुमारास ही बस मेढा बसस्थानकात जात होती. मेढ्यात बाजार चौकात आल्यानंतर शालिनी चव्हाण ही मुलगी अंजलीला घेऊन बसमधून खाली उतरली. त्यानंतर ती थोडे अंतर पुढे गेली. मात्र, कमी दिसत असल्याने तिला आपण एस. टी. समोरच आहोत हेच समजले नाही. त्यातच बसच्या  पुढे जाळ्या लावल्यामुळे बस चालक दादा जाधव यालाही ती  दिसली नसल्याने शालिनी याच बसच्या पुढच्या चाकाखाली आल्या. माय लेकींच्या अंगावरून बसचे चाक गेल्याने दोघींचा जाग्यावरच मृत्यू झाला.

हा अपघात झाल्यानंतर बसचा चालक दादा जाधव हा मेढा पोलिस ठाण्यात स्वत:हून हजर झाला.  या घटनेनंतर दोघींच्या मृतदेहाचे मेढा ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. यानंतर रात्री उशिरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.