Tue, Apr 23, 2019 10:24होमपेज › Satara › गर्भपात औषध प्रकरणाचा अहवाल मागवला 

गर्भपात औषध प्रकरणाचा अहवाल मागवला 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

जिल्ह्यात मेडिकल टर्मिनल ऑफ प्रेग्‍नन्सी (एमटीपी) किटची बेकायदेशीरपणे विक्री करणारी मोठी टोळी कार्यरत आहे. अन्‍न व औषध प्रशासन, तसेच पोलिस प्रशासनातर्फे या टोळीचा पर्दाफाश करण्याचे काम सध्या सुरू आहे. दरम्यान, बेकायदेशीर गर्भपात औषधप्रकरणाची गंभीर दखल घेत पुणे सहआयुक्‍त (औषधे) विद्याधर जावडेकर यांनी सातारा कार्यालयाकडून अहवाल मागवला असून त्यांनी कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत.

कोंडवे (ता. सातारा) येथील कारवाईत अन्‍न व औषध प्रशासनाला सापडलेल्या गोळ्या  उत्तराखंडमधील सायनोकेम प्रा. लि. कंपनीच्या असल्याचे उघड झाले. या गोळ्यांची खातरजमा करण्यासाठी कंपनी अधिकार्‍याला पाचारण करण्यात आले आहे. गर्भपाताच्या गोळ्यांचा वापर करून स्त्रीभ्रूण हत्या होत आहेत. तसेच अनावश्यक गर्भ काढून टाकण्यासाठीही गर्भपात गोळ्या वापरल्या जात आहेत. चार वर्षांपूर्वी अशा औषधांच्या खरेदी-विक्रीची तपासणी मोहीम अन्‍न व औषध प्रशासनाने (एफडीए) हाती घेतली होती.

 मोहिमेच्या प्रारंभी अशा गोळ्यांच्या विक्रीला काही प्रमाणात पायबंद बसला. त्यानंतर मात्र या मोहीमेकडे दुर्लक्ष झाल्याने या गोळ्यांची चोरीछुपके विक्री पुन्हा वाढली. त्यामुळे अशा गोळ्यांची बेकायदेशीर विक्री करणारी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले. या रॅकेटशी काही डिस्टीब्युटर्सचे लागेबांधे असल्याची शक्यताही व्यक्‍त होत आहे. या प्रकरणाची पुणे सहआयुक्‍त (औषधे) विद्याधर जावडेकर  यांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाची संपूर्ण माहिती त्यांनी सातार्‍याचे सहायक आयुक्‍त सुलोचने यांच्याकडून घेतली तसेच याचा संपूर्ण अहवालही त्यांनी औषध प्रशासनाकडून मागवला आहे. अशीच कारवाई सुरु ठेवण्याचे निर्देश जावडेकर यांनी दिले आहेत. 

Tags : satara, satara news, abortion drug, case, report,


  •