Sun, May 26, 2019 17:35होमपेज › Satara › सहाशे पानांचे दोषारोपपत्र दाखल

सहाशे पानांचे दोषारोपपत्र दाखल

Published On: Jan 05 2018 1:27AM | Last Updated: Jan 04 2018 10:29PM

बुकमार्क करा
सातारा : प्रतिनिधी

आनेवाडी टोलनाक्याच्या हस्तांतरणाच्या वादातून सुरुची बंगल्याबाहेर झालेल्या राडाप्रकरणात गुरुवारी तब्बल सहाशे पानांचे पहिले दोषारोपपत्र दाखल झाले असून यामध्ये 92 संशयित नावांचा समावेश आहे. आरोपपत्रामध्ये खा. उदयनराजे भोसले व आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या नावांचाही समावेश असून पोलिसांनी जी कलमे लावली आहेत, त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दरम्यान, याप्रकरणी पुरवणी दोषारोपपत्रही दाखल केले जाणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

आनेवाडी टोलनाक्याचे व्यवस्थापन ताब्यात घेण्याच्या कारणावरून 5 ऑक्टोबर 2017 रोजी खा. उदयनराजे भोसले व आ. शिवेंद्रराजे भोसले समर्थक सातार्‍यात भिडले होेते. आमदार निवासस्थानाच्या बाहेर झालेल्या तुफान राड्यावेळी गोळीबारीसह तोडफोड व जाळपोळही झाली होती. दुसर्‍या दिवशी शाहूपुरी पोलिस ठाण्यात पोनि किशोर धुमाळ यांनी खा. उदयनराजे, आ. शिवेंद्रराजे यांच्यासह दोन्ही गटांतील 200 जणांवर खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्याची तक्रार दिली.  गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासामध्ये पोलिसांनी दोन्ही गटातील जणांना 18 जणांना अटक केली. पोनि धुमाळ यांनी दिलेल्या तक्रारीचा तपास पोलिस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर यांनी केला. तपासामध्ये या गुन्ह्याचे दोषारोपपत्र तयार करण्यात आले.

गुरुवारी न्यायालयात दाखल झालेले हे दोषारोपपत्र तब्बल 600 पानांचे असून यामध्ये खासदार व आमदार यांच्या नावाचाही उल्‍लेख आहे. अद्याप अन्य संशयितांना अटक करायचे असल्याने यापुढे जसजशी कारवाई होईल, तसतसे संशयितांचे पुरवणी दोषारोपपत्र तयार करून ते दाखल केले जाणार आहे. यामुळे उर्वरित कार्यकर्त्यांवर कारवाईची टांगती तलवार कायम आहे. याशिवाय पोलिसांनी जी कलमे लावली आहेत, त्यामध्ये कोणताही बदल केलेला नाही.

दरम्यान, गुरुवारी दोषारोपपत्र दाखल झाल्याने लवकरच न्यायालयीन प्रक्रियेत आता पुढील कार्यवाही होणार असून सुनावणीला सुरुवात होणार आहे.दरम्यान, शाहूपुरी पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल झाल्यानंतर दोन्ही गटातील बहुतांशी समर्थक पसार झाले आहेत. त्यातील काहीजण अटकपूर्व व नियमित जामिनासाठी सातारा जिल्हा न्यायालयात व उच्च न्यायालयातही गेले आहेत. अद्याप त्याबाबतचा काही जणांचा जमाीनअर्ज प्रलंबित आहे. यामुळे या प्रकरणाकडे जिल्ह्यातील सर्वांचे लक्ष लागले आहे.