Tue, Apr 23, 2019 05:37होमपेज › Satara › अपघातातून आदेश बांदेकर बचावले (video) 

अपघातातून आदेश बांदेकर बचावले (video) 

Published On: Feb 21 2018 5:50PM | Last Updated: Feb 21 2018 10:34PMकराड : प्रतिनिधी 

मुंबईतील सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष, शिवसेना नेते प्रसिद्ध अभिनेते आदेश बांदेकर हे कराडजवळील चार वाहनांच्या विचित्र अपघातातून बुधवारी बचावले. पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर आटके (ता. कराड) गावच्या हद्दीत झालेल्या या अपघातात बांदेकर यांच्या फॉरच्युनर कारसह तीन वाहनांचे मोठे नुकसान झाले असले, तरी सुदैवाने या अपघातात कोणासही इजा झालेली नाही. 

आदेश बांदेकर यांच्या हस्ते सिद्धिविनायक ट्रस्टकडून एक कोटीच्या मदतीचा धनादेश बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कोल्हापूरच्या जिल्हाधिकार्‍यांकडे दिला जाणार होता. या कार्यक्रमासाठी बांदेकर हे आपल्या फॉरच्युनर कारमधून कोल्हापूरच्या दिशेने जात होते. यावेळी त्यांच्यासोबत स्वीय सहाय्यक कुमार साळुंखे, अंगरक्षक सचिन सारंग हेही कारमधून प्रवास करत होते. तर शिवाजी शिंदे हे चालक होते. बांदेकर यांच्या कारमागे सिद्धीविनायक ट्रस्टची बोलेरोही होती. ही दोन्ही वाहने आटके गावाजवळील महामार्गालगतच्या सम्राट हॉटेलसमोर आली असता या ठिकाणी एका बोलेरो पिकअपचा टायर फुटला होता. त्यामुळे या पिकअपचे टायर तसेच अन्य काही साहित्य महामार्गावरच होते.

त्यामुळे या पिकअपला वाचवण्याच्या प्रयत्नात कोल्हापूरच्या दिशेने निघालेल्या स्विफ्ट डिझायर चालकाने अचानकपणे बे्रक मारला. त्यामुळे या स्विफ्टला पाठीमागून येणार्‍या बांदेकर यांची कार धडकली. अचानकपणे ही घटना घडल्याने बांदेकर यांच्या कारमागे असणारी सिद्धीविनायक ट्रस्टच्या बोलेरोचीही बांदेकर यांच्या फॉरच्युनरला पाठीमागून धडक बसली.

त्याचवेळी एक एसटीही कोल्हापूरच्या दिशेने निघाली होती. या एसटीचीही स्विफ्टला धडक बसली. मात्र यात एसटीचे किरकोळ नुकसान झाल्याने एसटी चालकाने घटनास्थळी न थांबता पुढे निघून जाणे पसंत केले. मात्र बांदेकर यांची कार तसेच अन्य दोन नुकसानग्रस्त वाहने घटनास्थळीच महामार्गालगत उभी होती. मात्र ज्या पिकअपचा टायर फुटला होता, त्याचा चालक घटनास्थळावरून निघून गेला होता. या अपघातानंतर महामार्ग मदत केंद्रातील वाहतूक पोलिसांसह कराड तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक क्षीरसागर यांच्यासह त्यांचे सहकारीही घटनास्थळी पोहचले होते. 

सायंकाळी सहापर्यंत कायदेशीर सोपस्कर पूर्ण करत बांदेकर यांची फॉरच्युनर घेऊन स्वीय सहाय्यक कुमार साळुंंखे, चालक शिवाजी शिंदे हे कोल्हापूरकडे रवाना झाले. तर स्विफ्ट डिझायर आणि टायर फुटलेली बोलेरो पिकअप कराडला आणण्याच्या हालचाली पोलिसांनी सुरू केल्या होत्या. 

हर्षल कदम यांच्या कारमधून कोल्हापूरचा प्रवास...

आदेश बांदेकर यांच्या कारला झालेल्या अपघाताची माहिती मिळताच शिवसेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष हर्षल कदम हे शिवसैनिकांसमवेत तातडीने अपघातस्थळी पोहचले होते. त्यानंतर कोल्हापूरचा कार्यक्रम लक्षात घेत आदेश बांदेकर हे कदम यांच्या कारमधून पुढे कोल्हापूरला रवाना झाले.