साताऱ्यात दुसरा रुग्ण कोरोनाबाधित आढळला

Last Updated: Mar 24 2020 11:28AM
Responsive image


सातारा : पुढारी वृत्तसेवा

सातारा जिल्ह्यात कॅलिफोर्निया येथून आलेला ६३ वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधीत आढळला आहे. जिल्ह्यातील हा दुसरा रुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे. 

कॅलिफोर्निया येथून प्रवास करुन आलेल्या व्यक्तीला ताप व घसादुखी असल्यामुळे शासकीय रुग्णालयामध्ये तातडीने विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. या संशयित रुग्णाची चाचणी केली असता त्याची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. अशी माहिती  जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

सोमवारी सकाळी ६३ वर्षीय वृध्द कॅलिफोर्नियातून तर ४३ वर्षीय पुरूष अबुधाबीतून सातार्‍यात दाखल झाले. यांना त्रास जाणवू लागल्याने हे दोघेही जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते. या सर्वांची तपासणी केल्यानंतर त्यांना अ‍ॅडमिट करण्यात आले आहे. या दोन रुग्णांमधील ६३ वर्षीय वृध्दाची चाचणी केली असता पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात चिंतेची बाब निर्माण झाली असून नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे बनले आहे.

दरम्यान, सातारा जिल्ह्यात एकाच दिवसातील हा दुसरा कोरोना बाधित रुग्ण आढळला असल्याचे समोर आले आहे. यापूर्वी काल (दि.२३) दुबईवरून आलेल्या ४५ वर्षीय एका महिलेला कोरोना झाल्याचे एनआयव्हीच्या अहवालात स्पष्ट झाले.