Wed, Mar 20, 2019 08:42होमपेज › Satara › कराड : महाविद्यालयीन युवकावर धारदार शस्त्राने वार

कराड : महाविद्यालयीन युवकावर धारदार शस्त्राने वार

Published On: Jan 27 2018 4:59PM | Last Updated: Jan 27 2018 4:59PMउंडाळे : प्रतिनिधी 

महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या नांदगाव (ता. कराड) येथील युवकावर शुक्रवारी रात्री धारधार शस्त्राने वार करण्यात आले आहेत. मंथन मधुकर आमणे (वय 18) असे जखमी युवकाचे नाव असून त्याच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

वाघ्या नावाच्या एका युवकावर याप्रकरणी संशय व्यक्त केला जात आहे. तो मनव येथे एका नातेवाईकाकडे वास्तव्यास असून त्याचे मूळगाव आटके (ता. कराड) असल्याचे समजते. मंथन आमणे हा ओंड येथील पंडित गोविंद पंत महाविद्यालयात बारावीत शिक्षण घेत आहे. तसेच नांदगाव बसस्थानक परिसरात त्याच्या कुटुंबियांचे वास्तव्य असून त्याचठिकाणी किराणा मालाचे दुकानही आहे.

संशयित युवक व मंथन यांच्यात यापूर्वी मैत्रीही होती. शुक्रवारी रात्री मंथन घरात बसला असताना अचानकपणे ‘वाघ्या’ नावाच्या युवकाचा त्याला फोन आला. यावेळी संबंधिताने मंथनला घराबाहेर येण्यास सांगितल्याने तो घराबाहेर आला. त्यानंतर काही समजण्यापूर्वीच संशयित युवकाने मंथनवर धारधार शस्त्राने हल्ला केला. यात त्याच्या पोटाला गंभीर दुखापत झाली आहे.संशयित वाघ्यासोबत काही साथीदारही घटनास्थळी उपस्थित होते. नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतल्याने संशयितांनी तेथून पोबारा केल्याचे सूत्रांनी सांगितले. हल्ल्यामागील कारण शनिवार सायंकाळपर्यंत स्पष्ट झाले नव्हते. याप्रकरणी कराड तालुका पोलिसात गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही सुरू होती.