Fri, Jul 19, 2019 07:04होमपेज › Satara › झेडपीच्या प्रेसची थकबाकी अर्धा कोटीच्या घरात

झेडपीच्या प्रेसची थकबाकी अर्धा कोटीच्या घरात

Published On: Aug 14 2018 1:05AM | Last Updated: Aug 14 2018 12:05AMसातारा : प्रविण शिंगटे

सातारा जिल्हा परिषदेच्या  प्रिटींग प्रेसच्या छपाईची थकबाकी सुमारे अर्धा कोटीच्या  घरात पोहोचली असून जिल्हा परिषदेच्या विविध विभागाकडे छपाई केलेल्या कागदपत्रांची  बिले अद्यापही दिली गेली नसल्याने  प्रिटींगप्रेसमधील कामे कागदाअभावी रखडली आहेत.

नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत प्रिटिंग प्रेसविषयी  सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन थाडे यांनी  थकीत बिलाची  रक्कम प्रत्येक विभागाकडून  त्वरीत वसूल करण्याचे आदेश संबंधित विभागांच्या अधिकार्‍यांना दिले आहेत.

गेल्या काही  वर्षापासून शासकीय व निमशासकीय कार्यालयांनी विविध  योजना व रोजच्या कामकाजासाठी लागणार्‍या कागदपत्रांची छपाई जिल्हा परिषदेच्या प्रिटिंग प्रेसमधून करण्यात आली, अनेक विभागांनी छपाई करून घेतली मात्र बिले द्यायला काढता पाय घेतला. त्यामुळे शिक्षण व अर्थ समिती सभापती राजेश पवार यांनी याबाबत गंभीर दखल घेवून नवीन धोरण आखले आहे. आता प्रिटिंग प्रेससाठी नवीन फोर कलर  मशीन घेण्याचा घाट जिल्हा परिषदेने घातला आहे. या मशिनमुळे सातारा जिल्हा परिषदेसह अन्य जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालयाच्या छपाईची कामे मिळण्यास मदत होणार आहे. छपाईची जी रक्कम आहे ती संबंधित शासकीय कार्यालयाकडून वसूल करून त्याची ठेवपावती करण्यात येणार आहे. पावतीच्या व्याजातून येणार्‍या निधीतून कर्मचार्‍यांचे पगार करण्यात येणार असल्याचे राजेश पवार यांनी सांगितले.

जिल्हा परिषद प्रिटींग प्रेसचे जिल्हाधिकारी कार्यालय 3 लाख 1 हजार 524 रुपये,जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी 4 हजार 99 रुपये, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा 92 हजार 654 रुपये, प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास सेवा योजना पंचायत समिती सातारा 20 हजार 572 रुपये, प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास सेवा योजना पं.स. खटाव  5 हजार 503 रुपये, प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास सेवा योजना पं.स. महाबळेश्‍वर 6 हजार 182 रुपये, प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास सेवा योजना पं.स. कराड 64 हजार 534 रुपये, प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास सेवा योजना पं.स. कोरेगाव 33 हजार 116 रुपये, प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास सेवा योजना पं.स. फलटण 41 हजार 656 रुपये, प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास सेवा योजना पं.स.पाटण 11 हजार 600 रुपये,पोलिस अधिक्षक सातारा 25 हजार 242 रुपये, कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सातारा 40 हजार 461 रुपये, विभागीय मृदू संधारण अधिकारी 9 हजार 434 रुपये, तहसील कार्यालय सातारा 10 हजार 865 रुपये, जिल्हा क्षयरोग अधिकारी सातारा 18 हजार 848 रुपये, वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रूग्णालय खंडाळा 26 हजार 294 रुपये, जिल्हा शल्यचिकीत्सक सिव्हील हॉस्पिटल सातारा 3 लाख 58 हजार 593 रुपये अशी एकूण 10 लाख 94 हजार 489 रुपयांची थकबाकी आहे.

जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांचे खातेप्रमुख 30 लाख 86 हजार 363 रुपये, पंचायत समिती गटविकास अधिकारी कार्यालये 1 लाख 31 हजार 905 रुपये, जिल्हा परिषदेची उपविभागीय कार्यालये 48 हजार 183 रुपये, जिल्ह्यातील शासकीय निमशासकीय कार्यालये 10 लाख 94 हजार 489 रुपये, जिल्हा बाहेरील शासकीय निमशासकीय कार्यालये 6 लाख 11 हजार 510 रुपये, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व खासगी संस्था 19 हजार 498 रूपये  असे मिळून 49 लाख 91 हजार 948 रुपयांची थकबाकी आहे.

जिल्हा परिषदेच्या प्रिटींग प्रेसची विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयाकडे सुमारे 50 लाख रुपयांची थकबाकी आहे, असे कागदोपत्री दाखवले असल्याचे चित्र दिसत आहे.मात्र ही थकबाकी संबंधित कार्यालयाकडे कशी शिल्लक राहिली, याबाबत संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांनी पाठपुरावा केला का ? का यामध्ये छपाई कमी आणि कमिशन जास्त, अशी चर्चा झेडपी वर्तुळात सुरू आहे.