Thu, Apr 25, 2019 15:26होमपेज › Satara › शिवेंद्रराजेंकडून जनतेची दिशाभूल : दीपक पवार

शिवेंद्रराजेंकडून जनतेची दिशाभूल : दीपक पवार

Published On: Feb 17 2018 2:08AM | Last Updated: Feb 16 2018 11:22PMसातारा : प्रतिनिधी

बोगदा ते कास रस्त्याच्या डांबरीकरण, रूंदीकरणासाठी   80  कोटी रुपयांचा निधी आणला असल्याचे आ. शिवेंद्रराजे भोसले सांगत आहेत. मात्र, हा निधी  मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातूनच मिळाला आहे. आमदार लोकांची दिशाभूल करत आहेत. हे फेकू आमदार असून विकासाचे महामेरू म्हणून मिरवतात, असा टोला जि.प. सदस्य दीपक पवार यांनी पत्रकार परिषदेत लगावला.

दीपक पवार म्हणाले, प्रत्येक आमदाराचा 35 लाखांचा  निधी असतो. त्यामुळे प्रत्येक गावात विकासकामांवर 15 लाखाच्यावर त्यांना निधी टाकता येत नाही. असे असताना आ.शिवेंद्रराजे भोसले यांनी  बोगदा ते कास रस्त्यासाठी  80 कोटी कुठून  आणले? राज्यात आणि देशात भाजपाचे सरकार आहे. मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व  सार्वजनिक बांधकाममंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी सातारा, जावलीतील  रस्त्यांच्या व धरणाच्या कामासाठी 4 वर्षात भरघोस निधी दिला आहे. भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते रस्त्यांच्या कामासाठी पाठपुरावा करत आहेत. मात्र, आ. शिवेंद्रराजे भोसले प्रत्येक रस्त्याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहेत. आमदार विरोधी पक्षाचे असताना त्यांना अर्थ खाते दिले आहे का? असा सवालही पवार यांनी केला.

चिखली धरणासाठी सुमारे 16 कोटी रूपयांचा निधी,  मुख्यमंत्री सडक योजनेतून रायगाव ते सोनगाव फाटा या रस्त्यासाठी 9 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला.  साबळेवाडी ते वेळेकामथी रस्त्यासाठी  भाजपच्या कार्यकर्त्यांनी  पाठपुरावा केल्यामुळेच निधी मिळाला आहे, असे असताना आमदार मीच निधी  आणला, असा कांगावा करत आहेत. 15 वर्षे सत्तेत आमदार होता त्यावेळी  धरणग्रस्तांचे प्रश्‍न का आठवले नाहीत? त्यावेळी तुमचे तोंड शिवले होते का? महू हातगेघर धरणासाठी 1 रुपयाही त्यांनी आणला नाही, धरणासाठी 40 कोटी रुपयांचा निधी आणला मात्र आ.शिवेंद्रराजे भोसले व वसंतराव मानकुमरे यांनी धरणाचे काम बंद पाडले. भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सूचविलेल्या कामामुळे  विकासकामे होत असल्याचे दिपक पवार यांनी सांगितले.

आमदारांनी लोकांची दिशाभूल करण्याचे काम थांबवून समोर यावे.  आतापर्यंत त्यांनी कोणतेही काम केले नाही. सेना भाजप सरकारच विकास करण्यास कटिबध्द आहे. दुसर्‍याच्या फंडावर आपण फंड आणला हे म्हणणे बंद करावे. आतापर्यंत आमदारांनी केलेली स्टेटमेंट बोगस आहेत. बेबनाव व लोकांची दिशाभूल करण्याचा त्यांचा हा केविलवाणा प्रयत्न असल्याचेही  दिपक पवार म्हणाले. यावेळी नगरसेवक विजय काटवटे व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.