Tue, Jul 23, 2019 04:05होमपेज › Satara › ‘पुढारी’च्या वृत्ताचे झेडपीत पडसाद

‘पुढारी’च्या वृत्ताचे झेडपीत पडसाद

Published On: May 09 2018 1:51AM | Last Updated: May 08 2018 10:30PMसातारा : प्रतिनिधी

‘पीआरसीच्या नावाखाली अधिकारी झाले बडे’, या दैनिक ‘पुढारी’च्या वृत्ताचे पडसाद मंगळवारी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत उमटले. जिल्हा परिषदेमध्ये असे जर प्रकार घडले असतील तर कोणाचीही गय केली जाणार नसून त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी दिला.स्थायी समितीची सभा संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सभेस उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, शिक्षण सभापती राजेश पवार, कृषी सभापती मनोज पवार, समाजकल्याण सभापती शिवाजी सर्वगोड, महिला व बालकल्याण सभापती वनिता गोरे, भिमराव पाटील, रमेश पाटील, उदय कबुले, सुवर्णा देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे व विविध विभागाचे खातेप्रमुख उपस्थित होते.

पंचायत राज समितीबाबत ‘पुढारी’त आलेल्या वृत्ताबाबत स्पष्टीकरण देण्याच्या सूचना विविध सदस्यांनी केल्या. त्यावर खुलासा करताना डॉ. कैलास शिंदे म्हणाले, जिल्हा परिषदेत असे प्रकार घडले असल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही. याबाबत माहिती घेवून कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.जिल्हा परिषदेच्या विविध विभागात एकाच टेबलावर गेल्या 3 ते 5 वर्षे कर्मचार्‍यांनी बस्तान मांडले आहे, अशा कर्मचार्‍यांचे टेबल बदलाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बदली करण्यात यावी, अशा सूचना पदाधिकार्‍यांनी अधिकार्‍यांना दिल्या.तसेच विविध संवर्गातील पदोन्नतीची प्रक्रिया बदल्यांची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर सामान्य प्रशासन विभागाच्यावतीने करण्यात येणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

सभेत महाराष्ट्र शासनाकडून आलेले शासन निर्णय, परिपत्रके यावर चर्चा करण्यात आली. कंत्राटी ग्रामसेवकांनी नियुक्तीच्या वेळी जिल्हा निधीत जमा केलेली सुरक्षा ठेव परत करण्यासह ऐनवेळच्या विविध विषयावर चर्चा करण्यात आली.सातारा शहरातील ग्रेड सेप्रेरटरच्या कामासाठी पोवईनाक्यावरील शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याशेजारील  जागा कमी करण्यासंदर्भात संभाजी ब्रिगेडने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे या प्रश्‍नावर बोलताना संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणाले, शिवतीर्थाची जागा ही जिल्हा परिषदेच्या मालकीची नाही मात्र देखरेखीसाठी जिल्हा परिषदेकडे आहे. ग्रेड सेप्रेरटचे पुतळ्याशेजारी काम करताना  सुरक्षितपणे करावे व त्याची काळजी घेण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या आहेत.