Sat, Apr 20, 2019 08:34होमपेज › Satara › झेडपी आरोग्य, शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवेल

झेडपी आरोग्य, शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवेल

Published On: Mar 04 2018 1:39AM | Last Updated: Mar 03 2018 11:15PMसातारा : प्रतिनिधी

सातारा जिल्हा परिषदेच्या महाआरोग्य शिबिराने चांगला पायंडा पाडला आहे. या अभिनव उपक्रमामुळे ग्रामीण भागापर्यंत महाआरोग्य शिबिर पोहचले आहे. जिल्हा परिषदेने असेच कार्य सुरु ठेवले तर ग्रामीण भागातील जनतेला मुंबईची वाट धरावी लागणार नाही. झेडपीने आरोग्य व शिक्षण क्षेत्रात भरीव काम केले तर जिल्ह्यात क्रांती घडल्याशिवाय राहणार नाही, असा विश्‍वास ना. रामराजे नाईक—निंबाळकर यांनी व्यक्‍त केला.

जिल्हा परिषदेच्यावतीने जि.प. मैदानावर आयोजित जिल्हास्तरीय महाआरोग्य शिबिर, कर्मचारी  महामेळावा व विविध आदर्श कर्मचार्‍यांना पुरस्कार वितरण अशा संयुक्‍त कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास  खा. विजयसिंह मोहिते—पाटील, आ.शिवेंद्रराजे भोसले, आ. शशिकांत शिंदे, आ.दिपक चव्हाण, जि.प. अध्यक्ष संजीवराजे नाईक—निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे,   मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे  यांची प्रमुख उपस्थिती होती.

आ.शशिकांत शिंदे म्हणाले, झेडपीच्या जीवनज्योत अभियानामुळे तर 18 वर्षाखालील मुलांना कोणत्याही आजारावर अगदी मोफत असे उपचार करता येणार आहेत.  

जिल्हा परिषद अध्यक्ष संजीव नाईक-निंबाळकर  म्हणाले,  आजच्या महाआरोग्य शिबिरात 15 हजार रुग्णांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यांच्या पुढील उपचारासाठी जिल्हा परिषद प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी महिला दिनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषदेच्या 269 कर्मचार्‍यांचा गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या हस्ते पार पडला. आदर्श ग्रामसेवक पुरस्कार संदीप कदम यांच्यासह 12 जणांना देण्यात आला. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार मिळालेल्या सातारकर सुपुत्रांचेही सत्कार झाला.

कार्यक्रमास जि.प.चे शिक्षण सभापती राजेश पवार, महिला व बालकल्याण सभापती वनिता गोरे, कृषी  सभापती मनोज पवार, समाजकल्याण  सभापती शिवाजी सर्वगोड, बाळासाहेब भिलारे, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे,  ग्रामपंचायत शाखेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजीत बडे, महिला बाल विकास अधिकारी जावेद शेख,  ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नितीन थाडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत भोई, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार आदी उपस्थित होते.