Tue, Mar 19, 2019 20:28होमपेज › Satara › झेडपीतील कागदपत्रे पावसामुळे भिजली

झेडपीतील कागदपत्रे पावसामुळे भिजली

Published On: Aug 15 2018 1:26AM | Last Updated: Aug 15 2018 12:22AMसातारा : प्रतिनिधी

जिल्ह्याचे मिनीमंत्रालय म्हणून ओळखल्या जाणार्‍या सातारा जिल्हा परिषदेत जिल्हा ग्रामपंचायतीचा गाडा हाकणारा ग्रामपंचायत व कृषी विभाग गेल्या 2 ते 3 दिवसांपासून पाण्यात गेला आहे. भिंतीतून पाणी झिरपून येत असल्याने तळे निर्माण झाले आहे. कागदपत्रेही भिजली आहेत. सर्वत्र पाणी झाल्याने येथील कर्मचार्‍यांना काम करणे अवघड झाले आहे.

जिल्हा परिषदेमध्ये ग्रामपंचायत विभाग हा महत्त्वाचा विभाग आहे. या विभागातून जिल्ह्यातील 1 हजार 496 ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो. मात्र गेल्या  2 ते 3 दिवसांपासून पडणार्‍या पावसामुळे चौथ्या मजल्यावरील ग्रामपंचायत विभागात  भिंतीवरून पाणी झिरपून येत आहे. त्यामुळे कार्यालय परिसरात पाणीच पाणी झाले असल्याने कार्यालयाला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या झिरपणार्‍या पाण्यामुळे शॉर्ट सर्कीट होण्याची भीती निर्माण झाली आहे. सोमवारी सकाळी तर या कार्यालयातून 10 ते 12 बादल्या पाणी बाहेर काढले. तरीही पाणी हटता हटत नव्हते. त्यामुळे येथील कर्मचार्‍यांना अंगावर जर्कीन घेवून पाण्यात बसून काम करावे लागत आहे. दिवसभर कार्यालयातील कर्मचारी कपड्याने पाणी टिपून घेत हे पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते.

बांधकाम विभागाने स्लॅबवर दोन तीन दिवसांपूर्वी केेलेल्या कामामुळेच भिंतीवरून झिरपून पाणी येत असल्याचे कर्मचार्‍यांनी सांगितले. यापुर्वी पाऊस झाल्यानंतर असे पाणी कार्यालयात आले नव्हते मात्र काम केल्यानंतरच पाणी येत असल्याचे कर्मचार्‍यांनी अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिले.

या घटनेची माहिती ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांना कळाल्यानंतर त्यांनी पाहणी केली. त्यानंतर प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन थाडे यांनीही घटनास्थळी येवून पाहणी केली. त्यांनी तत्काळ बांधकाम विभाग दक्षिणचे कार्यकारी अभियंता एस.आर. पाटील यांना बोलावून त्वरित दुरूस्तीचे आदेश दिले. दरम्यान, तिसर्‍या मजल्यावरील कृषी विभागातही पाणीच पाणी झाले आहे. कृषी विभागाची महत्वाची कागदपत्रे या पाण्यामुळे भिजली आहेत. गुणनियंत्रण कामकाज फाईल्स, अभिलेख वर्गीकरण टपाल, कृषी, खत, औषधे दुकानदारांचे जुने परवाने यासह संगणक भिजले आहे. महत्त्वाची कागदपत्रे भिजल्याने याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाने योग्य ती दखल घेवून ज्यांनी स्लॅब फोडला त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.