Tue, Mar 26, 2019 23:55होमपेज › Satara › शाळा बंद निर्णयाविरोधात झेडपी सदस्य आक्रमक 

शाळा बंद निर्णयाविरोधात झेडपी सदस्य आक्रमक 

Published On: Jan 31 2018 2:02AM | Last Updated: Jan 30 2018 11:01PMसातारा : प्रतिनिधी

जिल्ह्यातील शाळा बंद होणार असल्याने त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. शासनाने ग्रामीण भागातील शिक्षणावर परिणाम होणारा निर्णय घेतल्याने या निर्णयाबाबत  सरकारच्या निषेधाचा ठराव घेण्याची मागणी सदस्यांनी जि. प. सभागृहात केली. त्याचबरोबर जावली तालुक्यातील शाळांमध्ये राजकीय कार्यक्रम होत असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याची तक्रारही सभेत करण्यात आली. 
जिल्हा परिषदेच्या छपत्रपती शिवाजी सभागृहात अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी पी. बी. पाटील व सभापतींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

झेडपी शाळांची गुणवत्‍ता ढासळल्याने त्याचा पटसंख्येवर परिणाम होत आहे. त्यातच शासनाने घेतलेला निर्णय ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी घातक असल्याची तक्रार  काही सदस्यांनी केली. त्यावर सीईओ डॉ. शिंदे म्हणाले, प्रशासन काम करत आहेच पण शाळेचे प्रश्‍न सोडवण्यासाठी तसेच गुणवत्‍ता वाढवण्यासाठी सदस्यांनीही योगदान देणे गरजेचे आहे. आपल्या शाळेतील शिक्षक काय करतात, हे सदस्यांनीही पाहिले पाहिजे. चौदाव्या वित्‍त आयोगातून करण्यात येणार्‍या कामांची माहिती किती सदस्य आपापल्या मतदारसंघातील ग्रामपंचायतीकडून घेतात? असा सवालही डॉ. शिंदे यांनी केला.  

जावली तालुक्यातील शाळा बंद ठेवून राजकीय कार्यक्रम घेण्यात आल्याचा प्रकार घडल्याची तक्रार  सदस्यांनी केली. शाळा बंद ठेवून कार्यक्रम घेण्यासाठी कुणी परवानगी दिली? असे कार्यक्रम शाळेत घेतले जातात? याचा खुलासा करावा, या मागणीसाठी सदस्य आक्रमक झाले. सदस्यांनी या प्रकरणाच्या संपूर्ण चौकशीचे आदेश शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांना दिले.  त्याठिकाणी कोणताही राजकीय कार्यक्रम झाला नाही. शिवाय कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समितीची परवानगी घेतल्याचे दीपक  पवारांनी सांगितले.  शाळा बंद ठेवण्याचे किंवा वेळेत बदल करण्याचे अधिकार स्थानिक शालेय व्यवस्थापन समितीला नाही. राजकीय कार्यक्रम शाळेत घेता येणार नाही. प्राथमिक शिक्षणाधिकार्‍यांकडून याप्रकरणी संपूर्ण चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्‍वासनही डॉ. शिंदे यांनी दिले. ‘रन फॉर नेशन’च्या कार्यक्रमास जावली तालुक्यातील 50 टक्क्यांहून अधिक शिक्षक हजर होते. त्यांनी रजा घेतली होती का? तसे नसेल तर त्या दिवशी झालेल्या विद्यार्थ्यांच्या शालेय नुकसानाला जबाबदार कोण? असा सवाल करण्यात आला. सीईओ म्हणाले, संबंधितांची माहिती घेतली जाईल. तसेच आढळल्यास त्यांच्यावर कारवाई तर केली जाईलच पण त्याशिवाय त्यादिवशीचे त्यांचे खाडे मांडले जातील, असेही डॉ. शिंदे यांनी सांगितले.

जावली पं.स.तील कर्मचारी उध्दट बोलत असून त्यांच्या बदलीची मागणी केली तरी त्यांच्यावर कारवाई होत नाही. पशुवैद्यकीय अधिकार्‍यांना कामाबाबत विचारले तर सीईओ कैलास शिंदे वर्गमित्र असल्याची ओळख सांगून वेळ मारुन नेतात, अशी तक्रार महिला सदस्यांनी केली. यावर सभागृहात हशा पिकला. डॉ. शिंदे म्हणाले, असे अभय कुणालाच दिलेले नाही. माझ्या नावाचा कुणी गैरवापर करत असेल तर त्याला समज देतो, असे आश्‍वासन डॉ. शिंदे यांनी दिले. 

कराड पं.स. समिती कार्यालयात रात्रीच्यावेळी गैरप्रकार चालत असल्याने त्याठिकाणी रात्रीच्यावेळी पहारेकरी नेमावा, अशी मागणी संबंधित सभापतींनी केली. जिल्ह्यातील सर्व पं.स. कार्यालयांना  रात्रीच्यावेळी सुरक्षेसाठी पहारेकरी देण्याचा विचार  प्रशासन करत असल्याचे सीईओ  डॉ. शिंदे यांनी सांगितले.

मानधनवाढीवर दोन्ही काँग्रेस-भाजप आमने-सामने

आमदार-खासदारांचे मानधन कित्येक पटींनी वाढले. त्यांना पेन्शनही मिळत आहे. जि.प. सदस्यांना मिळणार्‍या भत्यातून प्रवास खर्चही निघत नाही. त्यामुळे जि.प. ने बजेटमध्ये तरतूद करुन किमान 15 हजार रुपये मानधन करावे तसेच सदस्यांना पेन्शनही सुरु करावी, अशी मागणी  डॉ. शिवाजीराव चव्हाण, मानसिंगराव जगदाळे, भीमराव पाटील यांनी केली. राष्ट्रवादी व काँग्रेसच्या सदस्यांनी त्याचे समर्थन केले. त्याचवेळी भाजप सदस्य दीपक पवार यांनी या मागणीला विरोध करत स्व. यशवंतरावांना सत्‍तेतून पैसा नव्हे तर समाजकार्य करायचे होते. यशवंत विचारांचा विसर पडल्याची टीका केली. सभापती, उपसभापतींचेही मानधन वाढवावे, अशीही जोरदार मागणी काही पं.स. सभापतींनी केली.

शिवप्रतापदिनी औपचारिक सभा : जि.प.मैदान भाडेत वाढ

शिवप्रतापदिनी प्रतापगड तसेच यशवंतराव चव्हाण जयंतीनिमित्‍त  त्याठिकाणी घेतल्या जाणार्‍या विषय समित्यांच्या सभांना सदस्य येत नाहीत. धोरणात्मक चर्चा होत नाहीत. या सभाऐवजी विविध कार्यक्रम घ्यावेत, अशी मागणी सुरेंद्र गुदगे, उदयसिंह पाटील यांनी केली. यावर  वर्षानुवर्षांची ही परंपरा असून असे करता येणार नसल्याचे दीपक पवारांनी सांगितले. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशय सभागृहाचे भाडे निश्‍चित करताना जि.प. मैदान भाड्यात दुप्पटीने वाढ करण्यात आली.