Fri, Jul 19, 2019 05:06होमपेज › Satara › काटवलीतील युवकांनी दिले मोराला जीवनदान

काटवलीतील युवकांनी दिले मोराला जीवनदान

Published On: Aug 28 2018 1:45AM | Last Updated: Aug 27 2018 10:18PMभिलार : वार्ताहर 

काटवली  ता.जावली येथील ग्रामस्थांनी राष्ट्रीय पक्षी असणार्‍या जखमी मोराला औषधोपचार करून जीवदान दिले. ग्रामस्थांनी वन्य पक्ष्यांबाबत दाखवलेले औदार्य व आपुलकी पाहून परिसरात त्यांचे कौतुक होत आहे. 

काटवली येथील दीपक बेलोशे यांच्या शेतात एक जखमी मोर पडला असल्याचे काही लोकांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्परतेने जावली व  महाबळेश्‍वर वन विभागाशी संपर्क साधून अधिकार्‍यांना माहिती दिली. तोपर्यंत सरपंच हणमंत बेलोशे, तंटामुक्ती अध्यक्ष मधुकर बेलोशे धनराज वट्टे,  तेजस बेलोशे, अभिषेक बेलोशे, ओंकार पोरे यांनी व ग्रामस्थांनी जखमी मोराला काटवली येथील दवाखान्यात आणले. 

पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गोळे यांनी मोरावर प्राथमिक उपचार करुन अधिक उपचारासाठी मेढा येथे पाठवले. यावेळी हुमगावचे वनरक्षक आर.ऐ. परधाने व मेढ्याचे वनपाल रज्जाक सय्यद यांनी जखमी मोरास ताब्यात घेवून उपचारासाठी नेले. काटवली व परिसरात मोर व लांडोरांच्या संख्येत वाढ झाली आहे.त्यांचा शेतीत उपद्रवही वाढला आहे. असे असले तरी माणुसकीच्या भावनेने या जखमी मोराला ग्रामस्थांनी जीवदान देण्याचा केलेला प्रयत्न इतरांना प्रेरणादायी असल्याचे बोलले जात आहे.