Fri, Apr 19, 2019 12:02होमपेज › Satara › कराडात मराठा आरक्षणासाठी युवकांचे मुंडण 

कराडात मराठा आरक्षणासाठी युवकांचे मुंडण 

Published On: Aug 08 2018 1:51AM | Last Updated: Aug 07 2018 11:37PMकराड : प्रतिनिधी

मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी येथील दत्त चौकात सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनात आज मराठा युवकांनी मुंडण करून शासनाचा निषेध केला. यावेळी आक्रमक झालेल्या मराठा बांधवांनी आरक्षण देण्यास चालढकल करणार्‍या शासनाचे प्रांताधिकार्‍यासमोरच श्राद्ध घातले. गेली सात दिवसांपासून ठिय्या आंदोलन करणार्‍या महिलांनी आक्रमक पवित्रा घेत प्रांताधिकार्‍यांसह रस्त्यावरून ये-जा करणार्‍या नागरिकांना गाजर देऊन शासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. 

मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, मराठा युवकांवर दाखल सरसकट गुन्हे मागे घ्यावेत यासह विविध मागण्यांसाठी येथील दत्त चौकात महिलांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. मंगळवार आंदोलनाचा सातवा दिवस असल्याने महिलांसह मराठा बांधव मोठ्या प्रमाणावर आंदोलनात सहभागी होत आक्रमक झाले होते. मंगळवारी उंब्रज, मसूर व कोपर्डे हवेली परिसरातील शेकडो मराठा बंधू-भगिनी आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनस्थळी दाखल झाल्यानंतर जोरजोरात घोषणाबाजी करून आंदोलनकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. 

यावेळी महिलांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून आंदोलन स्थळावर ठिय्या मांडला. मराठा युवतींनी मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे, मराठा बांधवांवरील सरसकट गुन्हे मागे घ्या अशा आशयाचे फलक हातात घेतले होते. तर काही महिलांनी मराठा क्रांती मोर्चाचा भगवा झेंडा हातात घेतला होता. भगवे झेंडे व मराठा क्रांती मोर्चाच्या भगव्या टोप्यांमुळे दत्त चौकातील संपुर्ण वातावरण भगवे झाले होते. यावेळी मराठा युवतींसह अनेकांनी आपल्या भावना तीव्र शब्दात व्यक्‍त केल्या.

दरम्यान, शासन मराठा आरक्षणाबाबत चालढकल करत असून त्वरीत निर्णय जाहीर करावा या मागणीसाठी मराठा युवकांनी ठिय्या आंदोलनासमोरच मुंडण करून शासनाचा निषेध केला. यावेळी मराठा युवकांनी जोरजोरात घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. त्यानंतर मुंडण केलेल्या युवकांनी तेथेच शासनाचे श्राध्द घालत आंदोलन अधिक आक्रमक करण्याची भुमिका घेतली. तर ठिय्या आंदोलनात बसलेल्या महिलांनी रस्त्यावर उतरून शासनाच्या निषेधार्थ नागरिकांना गाजर वाटण्यास सुरुवात केली. याचवेळी प्रांताधिकारी हिम्मत खराडे यांचीही गाडी तेथे आल्याने मराठा महिलांनी त्यांनाही गाजर देऊन शासनाचा निषेध केला. दरम्यान, आंदोलक आक्रमक होत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊन नये म्हणून डीवायएसपी नवनाथ ढवळे स्वत: पोलिस फौजफाटा घेऊन उपस्थित होते.