Mon, Jan 21, 2019 02:43होमपेज › Satara › सावकारीला कंटाळून युवक बेपत्ता

सावकारीला कंटाळून युवक बेपत्ता

Published On: Dec 23 2017 2:12AM | Last Updated: Dec 22 2017 11:48PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

गुरुवार पेठेतील युवकाला सावकारीने दीड लाख रुपये दिल्यानंतर त्या मोबदल्यात तब्बल 11 लाख रुपये वसूल केल्यानंतरही सावकारांचा मानसिक त्रास सुरू असल्याने तो बेपत्ता झाला असल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात  पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून त्यामध्ये दोन महिलांचाही सहभाग आहे.

जमीर पठाण (रा. गुरुवार पेठ), शौकत सय्यद (रा. कमानी हौद), यासीन सय्यद (रा. सांगली), मिना भिसे (रा. खर्शी ता. जावली) व शबाना शेख यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, तेजस गणपतराव जाधव असे त्रासाला कंटाळून बेपत्ता झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी बेपत्ताचा भाऊ प्रकाश जाधव यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

तेजस जाधव याने 2015 मध्ये शौकत  सय्यद याच्याकडून दोन टप्प्यात दीड लाख व 15 हजार रुपये व्याजाने घेतले. संबंधित पैसे वेळोवेळी दिले मात्र, त्यानंतर काही काळ खंड पडल्याने सावकारांनी दंड वसूल केला. पैसे वसूल करण्यासाठी घरी जावून मानसिक त्रास देत मारहाण केली. पैसे देवून सावकारांचा तगादा असल्याने तेजस बेपत्ता झाला. याबाबतची तक्रारही पोलिस ठाण्यात नोंद झालेली आहे. दरम्यान, प्रकाश जाधव यांना नुकतेच एक पत्र मिळाले असून ते पत्र तेजस याने त्यांना लिहून घडलेल्या घटनेबाबतची माहिती दिली.

तक्रारदार प्रकाश जाधव यांनी ते पत्र घेवून पोलिसांना देवून संशयितांविरुध्द तक्रार असल्याचे सांगितले. तक्रारीनुसार पोलिसांनी पाच जणांविरुध्द सावकारीचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, सातार्‍यात अजूनही सावकारी पाळेमुळे घट्ट असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. सावकारीच्या जाचहाटाला कंटाळून युवक बेपत्ता झाल्याने पोलिसांच्या तपासाकडे लक्ष लागले आहे.