Mon, May 20, 2019 10:05होमपेज › Satara › तरूणाई अडकतेय राजकीय मोहजालात

तरूणाई अडकतेय राजकीय मोहजालात

Published On: Dec 08 2017 1:43AM | Last Updated: Dec 07 2017 10:29PM

बुकमार्क करा

सातारा : सुशांत पाटील

बदलत्या युगात शिक्षणाची नानाविध कवाडे खुली झाली असून ज्ञानाच्या कक्षाही रूंदावल्या असताना करिअर करायचं सोडून अनेक विद्यार्थी राजकीय मोहजालात अडकत असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. दिशाहीन झालेल्या या तरूणाईचा वापर राजकीय नेतेमंडळी आपल्या कार्यक्रमांना गर्दी जमवण्यासाठी करून घेऊ लागले आहेत. नेतेमंडळींच्या प्रभावाखाली गेलेल्या या तरूणाईच्या करियरचं मात्र वाटोळं होत असल्याचे चित्र आहे. याकडे पालकांनी वेळीच गांभीर्याने लक्ष देण्याची गरज  निर्माण झाली आहे.

कॉलेजला जातो म्हणून घरी सांगणार्‍या युवकांचे बाहेरच जास्त उद्योग चाललेले असतात.  मित्रांसोबत दिवसभर ना-ना उद्योग केल्यानंतर परत कॉलेज सुटण्याच्या वेळेत घराकडे परतायचे, असे प्रकार करुन कॉलेजकुमार कुटुंबीयाच्या डोळ्यातही धुळफेक करत आहेत. याचाच फायदा घेऊन काही युवा नेतेमंडळी या तरुणांना पक्षाच्या विविध कार्यक्रमात सामावून घेतात. या तरुणांना देखील जाण्यायेण्याची व खाण्यापिण्याची सोय केली की ही मंडळी दिवसभर नेते, ‘तुम्ही तिथं आम्ही’  असा तोरा करत दिवसभर नेत्यांची हांजी हांजी करतात. 

कॉलेजचा वेळ नेत्यांच्या कार्यक्रमात घालवतात. मग हे बहाद्दर पक्षाचा स्कार्प गळ्यात बांधून पक्षाचा झेंडा गाडीला लावून जणू काय आपणच नेता आहे, अशा अविर्भावात राहतात. नेतेमंडळींनीही कार्यकर्त्यांच्या माध्यमातून  डायरेक्ट कॉलेजवर फोकस ठेवला आहे. त्यामुळे  जिल्ह्यातील काही कॉलेज जणू राजकारणाची केंद्रेंच बनत चालली आहेत.

बस एक सेल्फी काफी है..

राजकारणी युवकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी त्यांच्या वाढदिवसाला फोन करणे किंवा मॅसेज करणे, तसेच कुठे भेटला तर त्याच्यासोबत सेल्फी काढणे, कार्यकर्त्याच्या टू व्हीलरवर बसलेले फोटो सोशल मीडियावर शेअर करणे, यासारखे फंडे वापरतात. त्यामुळेच तरुणाईला युवा नेत्यांची भुरळ पडत असून नेत्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी कॉलेजकुमार ठेवत आहेत.