Tue, Jul 16, 2019 09:39होमपेज › Satara › विनयभंग; युवकास अटक 

विनयभंग; युवकास अटक 

Published On: Apr 06 2018 1:29AM | Last Updated: Apr 05 2018 11:01PMसातारा : प्रतिनिधी

सातारा शहरातील सार्वजनिक शौचालयात अल्पवयीन मुलगी गेल्यानंतर तिचा विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाने अवघ्या 24 तासांत संशयिताच्या मुसक्या आवळल्या. विकास ऊर्फ सनी तानाजी भोसले (वय 30, रा. मंगळवार पेठ) असे संशयिताचे नाव आहे.

याप्रकरणाची अधिक माहिती अशी, दि. 2 रोजी सकाळी केसरकर पेठ येथे 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी सार्वजनिक शौचालयामध्ये गेली होती. मुलगी शौचालयाचा  दरवाजा ओढून लावत असतानाच एक अनोळखी पुरुष दरवाजातून आत गेला. अज्ञात व्यक्‍ती अचानक महिलांच्या सार्वजनिक शौचालयात आल्याने त्या मुलीने आरडाओरडा करत मदत मागण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संशयिताने घटनास्थळावरुन पलायन केले.

या घटनेने संबंधित मुलगी कमालीची घाबरली. तिने घडलेल्या घटनेबाबत कुटुंबियांना माहिती दिली. मुलीने सांगितलेल्या माहितीनंतर कुटुंबिय हादरुन गेले. अखेर मंगळवारी रात्री याप्रकरणी मुलीच्या आईने घडलेल्या घटनेबाबत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार अधिनियम अंतर्गत गुन्ह दाखल केला.

पोनि नारायण सारंगकर यांनी गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पोलिसांना घटनेचा शोध घेवून तत्काळ कारवाई करण्यच्या सूचना केल्या होत्या. पोलिस संशयिताच्या मागावर असतानाच गुरुवारी तो अंबेदरे रोडनजीक असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. डीबीच्या पथकाने सापळा लावला व संशयिताला अटक केली. 

पोनि नारायण सारंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार मुनीर मुल्‍ला, सुनील भोसले यांनी ही कारवाई केली असून पुढील तपास फौजदार वंजारी करत आहेत.

 

Tags : satara, satara news, crime, molestation case, Youth arrested,