Sun, Mar 24, 2019 16:44होमपेज › Satara › अक्षयकुमारने जिंकली युवतींची मने 

अक्षयकुमारने जिंकली युवतींची मने 

Published On: Feb 25 2018 1:13AM | Last Updated: Feb 24 2018 9:43PMसातारा : प्रतिनिधी

बॉलिवूडचा प्रसिद्ध सिनेस्टार व पॅडमॅन  चित्रपटाचा नायक अक्षयकुमार याने सातारकर तरूणाईची मने जिंकली. पोलिसांच्या कोल्हापूर परिक्षेत्रीय युथ पार्लमेंटरी चॅम्पियनशिप स्पर्धेच्या निमित्ताने तो आला होता. सुमारे अडीच तास रंगलेल्या या कार्यक्रमात अक्षयकुमारने महिला पोलिस व महाविद्यालयीन युवतींशी हटके संवाद साधला. मनमोकळ्या रंगलेल्या प्रश्‍नोत्तराच्या या मैफिलीत त्याने महिला आरोग्य व सुरक्षिततेविषयी प्रबोधनही केले. विशेष म्हणजे अक्षयकुमारने अस्सल मराठीतून संवाद साधला. 

युथ पार्लमेंटरी अंतिम चॅम्पियनशिप स्पर्धेचा प्रारंभ जिल्हा परिषदेच्या सभागृहात शनिवारी सकाळी पार पडला. यानिमित्ताने अक्षयकुमारने संवाद साधला. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील, पोलिस अधीक्षक संदीप पाटील,  अतिरिक्‍त जिल्हा पोलिसप्रमुख विजय पवार, पोनि पद्माकर घनवट उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला अक्षयकुमार याने मराठीतून सुरुवात करत उपस्थितांची मने जिंकली. भाषणबाजीला फाटा देऊन महिला पोलिस व युवतींना माईक देवून थेट प्रश्‍न विचारण्याचे आवाहन केले. त्यावर महिला व युवतींनी प्रश्‍नांची अक्षरश: सरबत्तीच केली. चित्रपटामध्ये नायकांनाच का प्रमुख भूमिका दिली जाते? सामाजिक चित्रपटात काम करताना कसे वाटते? खेड्यातील महिलांना सॅनिटरी पॅडविषयी माहिती नसल्याने काय केले पाहिजे? महिला सुरक्षेसाठी काय सांगाल? असे विविध प्रश्‍न विचारण्यात आले.

त्यावर अक्षयकुमार म्हणाला, भारत देशामध्ये आजही 82 टक्के महिला, मुली, युवती मासिक पाळीच्या कालावधीत सॅनिटरी नॅपकिन, पॅड वापरत नाहीत ही धक्‍कादायक व दु:खद बाब आहे.पॅड न वापरल्यामुळे कॅन्सरचे प्रमाणही वाढत आहे.  ‘महिला सुरक्षित तर देेश सुरक्षित,’ यामुळे आपल्या घरातील प्रत्येक महिला सुरक्षित ठेवणे हे प्रत्येकाचे काम असल्याचे आवाहन त्याने केले. 

चित्रपटामध्ये नायिकांनाही मुख्य भूमिकेचा रोल दिला जात असून तसे अनेक चित्रपट झालेले आहेत. तुम्हाला तसे वाटत नसेल तर मी माझ्या प्रोडक्शनच्या माध्यमातून नक्‍कीच नायिकांना मुख्य भूमिका देईन. यावेळी प्रश्‍न विचारलेल्या मुलीला ‘तुलाच मुख्य भूमिका देतो, तुम्ही या आणि भेटा’ असे सांगून त्याने आश्‍चर्याचा धक्‍का दिला. 

अक्षयकुमार पुढे म्हणाला, मी सामाजिक कार्यकर्ता नाही मात्र समाजाचे देणे लागत असल्याने आपण थोडेफार काम करतो. सर्वांनी आपले आरोग्य जपण्यासाठी लवकर उठावे व दररोज सुर्य उगवताना पहावा. आपल्या हक्‍कासाठी लढले पाहिजे. कोणतेही काम करताना लाज बाळगू नये, असे आवाहनही अक्षयकुमार याने केले. 

दरम्यान, यावेळी महिला पोलिसांच्यावतीने मानपत्र देऊन अक्षयकुमारला सन्मानित करण्यात आले. यावेळी समृध्दी बसरे, योगिता माने, सविता फाळके, केवल लोटेकर, रजनी पाटील आदींनी अक्षयकुमार याला प्रश्‍न विचारले.

लहानग्या मुलीनेही विचारला प्रश्‍न...

कार्यक्रमावेळी अक्षयकुमार याला प्रश्‍न विचारणार्‍या तिघांना स्टेजवर जाण्याची संधी मिळाली. लहान मुलगी प्रश्‍न विचारत असल्याचे पाहून अक्षयकुमारने तिला स्टेजवर बोलवले. तिनेही इंग्रजीमधूनच प्रश्‍न विचारत सर्वांची मने जिंकली.  सातारच्या रजनी पाटील या मुलीनेही मराठीतून प्रश्‍न विचारत स्टेज गाजवून सोडले. आपणही पोलिस किंवा आर्मीमध्ये जाणार असल्याचे सांगताच अक्षयकुमार प्रभावीत झाला. 

शिट्ट्या, टाळ्या अन् अक्षय.. अक्षयचा नारा

अक्षयकुमार हॉलमध्ये आल्यानंतर महिला पोलिस व युवतींनी टाळ्यांच्या गजरात त्याचे स्वागत केले. यावेळी फोटो काढण्यासाठी मोबाईल फ्लॅश वारंवार पडत होते. अक्षयकुमारने मराठीतून सुरुवात करताच हॉलमध्ये शिट्ट्यांचा पाऊस पडला. अक्षयकुमार स्टेजवरुन खाली आल्यानंतर त्याच्याशी बोलण्यासाठी व फोटो काढण्यासाठी अक्षरश: वेढा दिला. अखेर पोलिसांनी सर्वांना खाली बसवून अक्षयकुमारला परत स्टेजवर नेले. कार्यक्रमात सळसळणारा उत्साह असल्याने प्रश्‍न विचारणारे थांबायचे नावच घेत नव्हते. यामुळे प्रश्‍न विचारण्याची संधी मिळण्यासाठी तरुणाईचा मोठा आटापिटा सुरु होता.